केपटाऊन : वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत दोन आशियाई देश विजेतेपदासाठी आमनेसामने येणार आहेत. दुसर्या उपांत्य सामन्यात बांगलादेशने न्यूझीलंडचे आव्हान परतवून लावत अंतिम फेरी गाठली. विजयासाठी दिलेले 212 धावांचे आव्हान बांगलादेशने चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. बांगलादेशच्या महमदुल हसन जॉयने शतकी खेळी केली. त्यामुळे अंतिम फेरीत भारत आणि बांगलादेश भिडतील. हा महामुकाबला रविवारी (दि. 9) रंगणार आहे.
नाणेफेक जिंकत बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या गोलंजांनी हा निर्णय सार्थ ठरवत न्यूझीलंडला सुरुवातीच्या षटकांमध्येच धक्के दिले. अवघ्या 74 धावांमध्ये न्यूझीलंडच्या आघाडीच्या फळीतले चार फलंदाज माघारी परतल्यामुळे संघाची अवस्था बिकट झाली होती. यानंतर मधल्या फळीत निकोलस लिडस्टोन आणि बॅकहेम व्हिलर-ग्रिनॉलने महत्त्वपूर्ण खेळी करीत न्यूझीलंडचा डाव सावरला. निकोलस माघारी परतल्यानंतर न्यूझीलंडच्या तळातील फलंदाजांनीही निराशा केली, मात्र बॅकहेमने एक बाजू लावून धरत आपेेले अर्धशतक पूर्ण केलं. याचसोबत त्याने न्यूझीलंडला द्विशतकी टप्पाही गाठून दिला. बॅकहेमने नाबाद 75 धावांची
खेळी केली.
प्रत्युत्तरादाखल बांगलादेशच्या संघाची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. परवेझ हुसेन आणि तांझिद हसन हे सलामीवीर फलंदाज अवघ्या 32 धावांत माघारी परतले, पण यानंतर मोहमदुल हसन जॉयने संघाची सूत्रे आपल्या हाती घेत डावाला आकार दिला. मोहमदुलने तौहीद हृदॉय आणि शहादत हुसैनसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. यादरम्यान मोहमदुलने आपले शतकही पूर्ण केले. 100 धावा काढून तो माघारी परतला. त्यानंतर शहादत हुसैन आणि कर्णधार अकबल अलीने बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
अंतिम फेरीत बांगलादेशची गाठ प्रियम गर्गच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाशी पडणार आहे. यात भारताचे पारडे जड आहे. दुसरीकडे बांगलादेशही चांगल्या संघांना मात देऊन अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper