बीड : प्रतिनिधी
बीडमधली एक महिला 20व्यांदा गरोदर आहे. पीटीआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. हातावर पोट असल्याने आणि पाच सहा मुले सोडून स्वतःवर उपचार घेण्यास या महिलेने नकार दिला आहे. बीडमधील माजलगाव केसापुरी कॅम्प या ठिकाणी राहणार्या लंकाबाई खरात या विसाव्यांदा गरोदर असल्याचे पीटीआयने म्हटले आहे. 9 सप्टेंबर रोजी लंकाबाई खरात यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तपासण्या झाल्यानंतर डॉक्टरांनी लंकाबाईंना रुग्णालयात पुढचे दोन ते तीन महिने रहावे लागेल असे सांगितले, मात्र मुलांना आणि नवर्याला सोडून राहू शकत नाही असे या महिलेने सांगितले. त्यानंतर ही महिला घरी परतली. लंकाबाई खरात यांच्या नऊ मुली आणि दोन मुले जिवंत आहेत. त्यांची पाच मुले आणि तीन मुलींचा बाळंतपणादरम्यान मृत्यू झाला. लंकाबाई खरात या आतापर्यंत एकदाही रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल झालेल्या नाहीत. लंकाबाई खरात यांची अद्याप सोनोग्राफीही झालेली नाही. गरोदर मातेचे कार्डही त्यांना मिळालेले नाही. मागच्या वर्षी त्यांचा एक मुलगा दगावला. आता त्या पुन्हा गरोदर आहेत. म्हणजेच 18 महिन्यात त्यांना दोनदा मुले होतात. लंकाबाई खरात यांच्या चार मुली आणि एका मुलाचा विवाह झाला आहे. त्यांचीही 3, 4 आणि 5 अशी अपत्ये आहेत. त्यामुळे लंकाबाई वयाच्या 38व्या वर्षी आजीही झाल्या आहेत. त्यांना एकूण 11 नातवंडे आहेत. याआधीची बाळंतपणे घरीच झाली आहेत आता 20वे बाळंतपण रुग्णालयात होणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper