Breaking News

बीसीटी विधी महाविद्यालयात महिला दिनी ऑनलाइन व्याख्यान

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात सोमवारी (दि. 8) महाविद्यालयाच्या महिला विकास मंचातर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विशेष व्याख्यानाचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाकरीता मुंबई क्राईम ब्रँच महिला अत्याचार प्रतिबंधक शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शितल केंद्रे-मुंढे ह्या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांचे स्वागत प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी केले. शितल केंद्रे-मुंढे यांचे महिला सुरक्षा आणि पोलीस – सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

प्राचार्य डॉ. शितला गावंड यांनी प्रास्ताविक करताना जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगितले आणि प्रमुख पाहुणे सौ. शितल केंद्रे – मुंढे यांची ओळख करून दिली. त्याचबरोबर त्यांनी सुनो द्रोपदी शस्त्र उठा लो, अब गोविंद ना आएंगे ह्या सुप्रसिध्द कवितेच्या माध्यमातून आज स्त्रियांनी आत्मनिर्भर होणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले.

नंतर प्रमुख अतिथी शितल केंद्रे – मुंढे यांनी त्यांच्या भाषणात त्यांची पोलीस खात्यातील प्रदीर्घ सेवा आणि वेगवेगळ्या फौजदारी खटल्यात तपासीक अधिकारी म्हणून काम करताना आलेल्या अनुभवाच्या सहाय्याने स्त्रियांनी त्यांच्या विरुद्ध होणारे गुन्हे टाळण्यासाठी कसे जागृत राहिले पाहिजे आणि जीवन पद्धतीत काय बदल केला पाहिजे यांची सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर पोलीस कशारीतीने महिलांविरुध्द होणारे गुन्हे रोखण्यासाठी कसे सदैव तत्पर असतात यांची माहिती देताना, त्याकरिता असलेले अनेक हेल्पलाइन क्रमांक सांगितले आणि त्याची कार्यप्रणाली स्पष्ट केली.

व्याख्यानाच्या शेवटी प्रश्न-उत्तरे सदरात शितल केंद्रे – मुंढे यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापिका कृपा नाईक यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संचिता करंडक (अंतिम वर्षांची विद्यार्थिनी) हिने मानले. हा कार्यक्रम झुम या अ‍ॅपद्वारे ऑनलाइन पध्दतीने आयोजित करण्यात आला आणि त्याचबरोबर युट्यूबवर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आणि त्या माध्यमातून या कार्यक्रमात अनेक विद्यार्थी, माजी विद्यार्थी, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित झाले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने तर सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने करण्यात आली.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply