Breaking News

बीसीसीआय करणार पाक क्रिकेट संघावर बहिष्काराची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानावरही घेरण्याची तयारी सुरू केली आहे. पाक क्रिकेट संघाला वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्यास बंदी घालावी किंवा भारताने तरी या स्पर्धेतून माघार घ्यावी, अशी मागणी करणारे पत्रच सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासक समितीने (सीओए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या नावे लिहिले आहे, मात्र हे पत्र शशांक मनोहर यांना पाठवायचे किंवा कसे याबाबतचा निर्णय प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय हे घेणार आहेत.

बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी या पत्राचा मजकूर लिहिला असल्याचे समजते. भारताचा शेजारी देश पाकिस्तान सतत आपली भूमी दहशतवाद्यांना वापरू देत आहे. त्यांना मदत करीत आहे आणि भारत मात्र या दहशतवादाविरुद्ध लढत आहे. भारतात पाकिस्तानविरुद्ध खेळू नये असे मत आहे आणि भारत दहशतवादाबाबत कोणतीही तडजोड करू इच्छित नाही, असा मजकूर या ई-मेलमध्ये लिहिण्यात आला आहे. भारतीय संघाचा 16 जूनला मँचेस्टर येथे पाकविरुद्ध सामना होणार आहे. सरकारला जर हा सामना होऊ नये असे वाटत असल्यास हा सामना होणार नाही, अशी प्रतिक्रिया मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने व्यक्त केली आहे, मात्र भारत हा सामना खेळला नाही; तर पाकिस्तानला पूर्ण गुण मिळतील आणि भारतीय संघाला नुकसान होईल, असे मत या अधिकार्‍याने व्यक्त केले आहे.

मंडळाने छायाचित्रे हटवली

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बीसीसीआयने आपल्या मुंबईतील मुख्यालयातून पाकिस्तान क्रिकेटशी संबंधित छायाचित्रे आणि स्मृतिचिन्हे हटवली आहेत. भारतीय क्रिकेट क्लबसह अनेक राज्य क्रिकेट संघांनी आपापल्या कार्यालयांमधून पाकिस्तानशी संबंधित छायाचित्रे हटवल्यानंतर बीसीसीआयने हे पाऊल उचलले आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनने (व्हिसीएने)देखील नागपूर स्टेडियममधून पाकशी संबंधित छायाचित्रे हटवली आहेत.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply