नवी मुंबई : बातमीदार
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया (मुंबई) या मार्गावरील वॉटर टॅक्सीसेवेचा शुभारंभ मंगळवारी (दि. 7) बंदरे व खनिकर्ममंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते बेलापूर जेट्टी येथे झाला. या वॉटर टॅक्सीसेवेमुळे मुंबईत 55 मिनिटांमध्ये पोहचता येणार आहे.
या कार्यक्रमास आमदार मंदाताई म्हात्रे, बंदरे व परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, नयनतारा शिपिंग कार्पोरेशनचे कॅप्टन रोहित सिन्हा, इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेसचे सोहेल काझानी आदी उपस्थित होते.
उद्घाटनानंतर मंत्री भुसे यांनी वॉटर टॅक्सीतून बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया असा प्रवास केला. मुंबई व परिसरातील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी जलवाहतुकीला चालना देण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
आमदार मंदाताई म्हात्रे म्हणाल्या की, नवी मुंबईतील सागरी किनार्यावर जेट्टीच्या निर्मितीतून मच्छीमार तसेच पर्यटन व्यवसायाच्या वाढीसाठी मदत होणार आहे. बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी उपयुक्त ठरणार असून या सेवेला प्रतिसाद मिळाल्यास त्याचे दर कमी करण्यात यावेत. राज्यातील पहिल्या मरिना प्रकल्पालाही गती देण्यात यावी, असेही त्यांनी सूचित केले.
बेलापूर येथे लवकरच हॉवर क्राफ्ट सेवा
वॉटर टॅक्सीसेवेमध्ये एकूण 200 प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतात. ही सेवा नयनतारा शिपिंग कार्पोरेशन व इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेसमार्फत चालविण्यात येणार आहे. या सेवेबरोबरच मेरीटाईम बोर्डाच्या वतीने बेलापूर ते एलिफंटा, बेलापूर ते मांडवा मार्गावरही सेवा सुरू आहे. याशिवाय फ्लेमिंगो राईडही सुरू आहे. लवकरच बेलापूर येथे हॉवर क्राफ्ट सेवा सुरू करण्यात येणार आहे.
Check Also
केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा
पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …
RamPrahar – The Panvel Daily Paper