महामार्गावर अपघातांची भीती

पोलादपूर ः प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून उघड्या ट्रकमधून होणारी भात वाहतूक भाताचे कण हवेसोबत डोळ्यांत शिरत असल्याने अन्य वाहनांसाठी धोकादायक ठरत असल्याचे दृश्य दरवर्षीप्रमाणे दिसू लागले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66च्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी डायव्हर्शन रोड अस्तित्वात आले आहेत. भातपिकाच्या कापणीनंतर मळणी-झोडणीची प्रक्रिया पूर्ण होऊन पोत्यात भरलेला भात उघड्या ट्रकमधून पोती लादून काही व्यापारी गिरण्यांत घेऊन जाण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून नेत आहेत.
उघड्या ट्रकमधील भाताच्या पोत्यांवर चिकटलेले भाताचे कण ट्रकच्या मागील बाजूने जाणार्या दुचाकी वाहने तसेच प्रवासी वाहतूक करणार्या चालकांच्या डोळ्यांत जातात. त्यामुळे त्यांना वाहन चालविणे जिकिरीचे होत आहे. यामुळे दुचाकीस्वार तसेच अन्य वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता वाढीस लागली आहे. यामुळे भात वाहतूक करताना ट्रकवर आच्छादन घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper