टोकियो : वृत्तसंस्था
टोकियो ऑलिम्पिकमध्ये ज्या नेमबाजीतून सर्वाधिक पदक मिळण्याची आशा होती तेथे भारताला एकही पदक अद्याप मिळवता आले नाही. ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताच्या पुरुष आणि महिला नेमबाजांना मोठे अपयश आले. आज झालेल्या महिलांच्या 25 मीटर पिस्तूल पात्रता फेरीत देखील भारताला मोठी निराशा हाती आली. महिलांच्या 25 मीटर पिस्तूल पात्रता फेरीत भारताच्या मनू भाकर आणि राही सरनोबत यांचा सहभाग होता. पात्रता फेरीत गुरुवारी (29 जुलै) झालेल्या प्रेसिशन राउंडमध्ये मनू भाकरने 292 गुण मिळवत पाचवे स्थान, तर राही सरनोबतने 287 गुणासह 18वे स्थान मिळवले होते. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी शुक्रवारच्या रॅपिड राउंडमध्ये दोन्ही नेमबाजांना चांगली कामगिरी करण्याची गरज होती. रॅपिड राऊंडमध्ये राहीने 96,94,96 असे 286 गुण मिळले. प्रेशिसन आणि रॅपिडमध्ये मिळून तिचे 573 गुण झाले. अंतिम फेरीत पोहोचण्यास ती अपयशी ठरली. त्यानंतर भारताची आशा मनू भाकरवर होती. मनूने रॅपिड राऊंडमध्ये 96,97,97 असे 290 गुण मिळवले. तिचे एकूण गुण 582 झाले आणि मनू देखील अंतिम फेरीत पोहोचण्यास अपयशी ठरली. नेमबाजीत आता महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोजिशनमध्ये तेजस्विनी सावंत आणि अंजुम मुद्गील, तर पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोजिशनमध्ये ऐश्वर्य प्रताम सिंह तोमर आणि संजीव राजपूत यांच्याकडून आशा असतील. महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोजिशनची पात्रता फेरी शनिवारी (31 जुलै), तर पुरुषांची पात्रता फेरी 2 ऑगस्ट रोजी होणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper