खारघर ः प्रतिनिधी
तरुणाईच्या कलागुणांसाठी हक्काचे व्यासपीठ असणार्या भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात 11 ते 14 मेदरम्यान अभियान 2021 या ऑनलाइन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वरांनी आणि वादनाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. गायन स्पर्धेत रिद्धी समवादेने प्रथम, तर द्वितीय क्रमांक उमंग निगमने पटकावला. वादन स्पर्धेत सिद्धार्थ गरूडने प्रथम, तर ओजस जोशीने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तरुणाईच्या कलागुणांना वाव देत 13 मेच्या पूर्वसंध्येला नेत्रदीपक नृत्यस्पर्धा झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करीत स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने झाली. वैयक्तिक नृत्यामध्ये प्रथम क्रमांक मेधा तेंडुलकर, तर द्वितीय क्रमांक पियूष डांगळेने प्राप्त केला. गट नृत्य स्पर्धेत के. जे. सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने क्रमांक पटकावला आहे.
अभियान 2021 अंतर्गत नेत्रदीपक फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. भारती विद्यापीठचा व्हर्च्यूअल फॅशन शो 14 मे रोजी यू ट्यूब चॅनेलवर झाला. विद्यार्थ्यांनी शैली, साहित्य आणि संकल्पनांचा एकत्रित मिलाप करीत त्यांचे कौशल्य प्रदर्शित केले. फॅशन शोमध्ये ‘ऑफ रॅक पॅक’ गटाने प्रथम क्रमांक पटकावला. मिस्टर अभियान हे पारितोषिक मकरंद थोराट याला मिळाले, तर मिस अभियान हे पारितोषिक स्मृती भटला मिळाले. फॅशन शोमध्ये राज सिंग व्यक्तिगत मुलांमध्ये आणि व्यक्तिगत मुलींमध्ये मानसी चव्हाण हिने पारितोषिक पटकावले. ‘पुन्हा शाळेत जावे’ थिमवर आधारित अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper