पेण तालुक्यातील शेकडो एकर भातशेती खार्या पाण्याखाली


पेण : प्रतिनिधी
तालुक्यातील भाल विठ्ठलवाडीची उघाडी फुटून समुद्राचे पाणी पेण खारेपाट परिसरातील शेकडो एकर भातशेतीत शिरले आहे. या उघाडीची तात्काळ दुरुस्ती करून ती बांधली नाही तर हे समुद्राचे पाणी तालुक्यातील थेट वाशी ते वाशीनाक्यापर्यंत जावून, त्या परिसरातीलही सर्व शेतीचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पेण तालुक्यातील भाल विठ्ठलवाडी येथील उघाडीच्या दरवाजाची चौकट काही दिवसापूर्वी नादुरुस्त झाली होती. त्यातून पाणी जात होते. मात्र गुरुवारी (दि. 12) उधाणामध्ये या उघाडीचा दरवाजाची संपूर्ण चौकटीसह कोलमडून पडल्यामुळे दोन मीटर लांबीचा बंधारा फुटून भाल-विठ्ठलवाडी परिसरातील शेकडो एकर शेत जमिनीत समुद्राचे खारेपाणी घुसले आहे. धरमतरखाडी प्रवण क्षेत्रामध्ये समाविष्ट पेण खारेपाटांतील गावे ही समुद्राच्या हायटाईडपेक्षा पाच ते सहा फुट खोलीवर वसलेली आहेत. दरवेळी समुद्राला येणार्या उधाण भरतीमुळे काहीवेळा संरक्षक बंधारे फुटून समुद्राचे खारेपाणी गावागावांतील घरांमध्ये शिरुन मोठे आर्थिक नुकसान होते. या समस्येवर तातडीने उपाय योजना होणे आवश्यक आहे. भाल विठ्ठलवाडीची उघाडी फुटण्याची समस्या अतिशय गंभीर असून या संबंधी खारभुमी सर्व्हेक्षण विभागाने वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत.
भाल विठ्ठलवाडी येथील उघाडीच्या दरवाजाची फ्रेम नादुरुस्त होऊन त्यातून पाणी जात होते. गुरुवारी उधाणामध्ये ती संपूर्ण फ्रेम कोलमडून पडल्यामुळे दोन मीटर लांब बंधारा फुटुन भाल- विठ्ठलवाडी परिसरात पाणी शिरले आहे.
-सोनल गायकवाड, खारभूमी विभाग अधिकारी, पेण
RamPrahar – The Panvel Daily Paper