Breaking News

मंडळांचा गणेशोत्सव यंदा दीड दिवसाचा

पनवेल : बातमीदार – नवी मुंबईतील मोठ्या सार्वजनिक मंडळांनी 11 दिवसांऐवजी दीड ते पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. काही मंडळांनी लहान गणेशमूर्तीचे पूजन करून कृत्रिम तलावात विसर्जन करावयाचे नियोजन आखले आहे.

शहरातील काही गणेश मंडळांनी गणेशोत्सवात सामाजिक उपक्रमावर भर दिला आहे. यात तुर्भेतील शिवछाया मित्रमंडळाने यंदा दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा करण्याचे नियोजन केले आहे. त्याच वेळी गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा निर्णय घेतल्याचे अंकुश वैती यांनी सांगितले. तर वाशी येथील श्रीगणेश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पाच दिवस उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. कोरोनाकाळात उत्सव साजरा केला जाईल. यात टाळेबंदीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल, असे भरत नखाते यांनी सांगितले. याच वेळी वाशीचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे संपत शेवाळे यांनी सांगितले.

दरम्यान, शासनाकडून आलेल्या मार्गदर्शिकेनुसार महानगरपालिका प्रशासनानेही शहरातील सर्व सार्वजनिक व खाजगी गणेश मंडळांना कार्यक्रम साजरा करावाच्या नियमावलीची माहिती दिली आहे. कोपरखैरणेतील उमेद प्रतिष्ठानने दीड दिवस गणेशमूर्तीचे पूजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी उत्सवात जमा झालेली रक्कम ही शालेय साहित्यासाठी देण्यात येईल. याशिवाय रक्तदान शिबिर राबविणार असल्याची माहिती संदीप राजपूत यांनी दिली.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply