
मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. कुर्ल्याजवळील चुनाभट्टी भागात रस्त्याचे काम सुरू होते. या ठिकाणी चार कामगार उपस्थित होते. त्या वेळी कप्तान मलिक तिथे दाखल झाले. त्यांनी या कामगारांना वर्क ऑर्डर कुठे आहे, असे विचारत मारहाण केली. अचानक झालेल्या मारहाणीने कामगार भयभीत झाले. रस्त्यावर एका ठिकाणी खोदकाम करण्यात आले होते. या ठिकाणी फायबर केबलचे काम सुरू होते. त्या ठिकाणी मलिक यांनी कामगारांकडे वर्क ऑर्डरची मागणी केली. कामगारांना मारहाण केल्यानंतर मलिक यांनी त्यांना धमकीही दिली. माझ्याविरोधात जाऊन पोलीस ठाण्यात तक्रार करा, मात्र इथे दिसलात तर हातपाय तोडून टाकू, अशी धमकी त्यांनी दिली. दरम्यान, हा व्हिडीओ जुना असल्याची प्रतिक्रिया कप्तान मलिक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. कामाची कोणतीही परवानगी नसतानादेखील काम सुरू करण्यात आले होते. नाइलाजस्तव आपल्याला हात उचलावा लागला असल्याचे कप्तान मलिक यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper