मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीने बुधवारी (दि. 28) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. मंदिरे उघडण्याची मागणी करणारे पत्र त्यांनी राज्यपालांना दिले. महाविकास आघाडी सरकारने 1 नोव्हेंबरपर्यंत मंदिरे खुली करण्याचा निर्णय न घेतल्यास मंदिरांची टाळी फोडू, असा स्पष्ट इशारा भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर ठाकरे सरकारला दिला आहे.कोरोनामुळे राज्यातील मंदिरे गेल्या सात महिन्यांपासून बंद आहेत. इतर सर्व गोष्टी सुरू करण्यात आल्या असताना मंदिरे मात्र बंद ठेवली गेली आहेत. ती खुली करण्याच्या मागणीसाठी याआधी आम्ही राज्यभर घंटानाद आंदोलन केले, मात्र ठाकरे सरकारने त्याची दखल घेतली नाही. आता सरकारने 1 नोव्हेंबरपर्यंत मंदिरे खुली करण्याचा निर्णय घ्यावा; अन्यथा मंदिरांची टाळी फोडू, अशी भूमिका भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भोसले यांनी मांडली आहे.काही दिवसांपूर्वी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे भेटीसाठी वेळ मागितली होती, मात्र त्यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळ दिली गेली नाही. त्यानंतर आध्यात्मिक आघाडीने सरकारला दसर्यापर्यंतची मुदत दिली. तरीही ठाकरे सरकारने मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने आता आक्रमक पवित्रा घेत निर्वाणीचा इशारा दिला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper