Breaking News

मच्छीमारांना भरपाई मिळून देण्यासाठी भाजप प्रयत्नशील

नवी मुंबई : प्रतिनिधी

2020 पासून कोकणपट्टीमधील सहा जिल्ह्यांत मत्स्यव्यवसाय करणार्‍या मच्छीमारांवर मोठी आर्थिक संकटे आली आहेत. त्यांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नवी मुंबईमधील विधानपरिषद आमदार रमेश पाटील व त्यांचे सुपुत्र भाजप राज्य मच्छीमार सेलचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चेतन पाटील प्रयत्न करीत आहेत. शासनाबरोबर बैठका, निवेदनाबरोबरच प्रशासन संबंधित विभागाचे मत्स्यविकास मंत्र्याबरोबर वेळोवेळी बैठकीचे आयोजन करून मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

निसर्ग वादळ असो की आता आलेला तौक्ते वादळामध्ये दोघेही पितापुत्र स्वतः बाधित झालेल्या मच्छीमारांना भेटुन पाहणी करून नुकसान झालेल्या मच्छीमारांच्या प्रति मदत मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. दरम्यान, राज्य शासनाकडून मदत मिळत नाही. म्हणून आमदार निधी व स्वतःच्या खिशातून खर्च करून आपल्याला जितकी होईल तितकी मदत आमदार रमेश पाटील यांनी केली आहे.

कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील मच्छीमारांची उपजीविका मासळी व्यवसायावर चालते. मागील वर्षी 3 जून रोजी आलेल्या महाभयानक निसर्गवादळाने मच्छीमारांच्या होड्या, जाळे, घरे, फळबागा नेस्तनाबूत झाल्या. अनेक मच्छीमार बेपत्ता झाले, तर काहींचा मृत्यू झाला. या विषयी अनेकदा आमदार रमेश पाटील, अ‍ॅड. चेतन पाटील यांनी मच्छीमारांना आर्थिक मदत मिळावी म्हणून मत्स्यविकास मंत्री अस्लम शेख याना निवेदने दिली. त्याचबरोबर ऑनलाइन बैठका लावल्या, परंतु आजतागायत मच्छीमारांच्या तोंडाला पाने पुसल्याची माहिती आमदार रमेश पाटील यांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी आलेल्या तौक्ते वादळामध्येसुद्धा सहाही जिल्ह्यातील मच्छीमारांची मोठी हानी झाली. मच्छीमारांना आर्थिक बळ मिळावे म्हणून एक प्रसिद्धी पत्रक काढले, तसेच मदत मिळाली नाही तर आक्रोश मोर्च्याचा इशाराही दिला.तसेच अलिबाग जिल्ह्यातील मच्छीमारांचे झालेल्या  नुकसानाची पाहणी करण्यासाठी विधान सभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना घेऊन अलिबाग येथील जेट्टीची पाहणी करण्यासाठी आमदार रमेश पाटील व अ‍ॅड. चेतन पाटील अलिबाग गाठून जेट्टी बरोबरच इतर ठिकाणाची पाहणी केली.

चक्रीवादळ व्यतिरिक्त अनेकदा मुसळधार पावसामुळेदेखील मच्छीमारावर आजपर्यंत अनेकदा आपत्ती आली आहे. यामध्ये सुद्धा मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यावेळी सुद्धा या पितापुत्रांनी लोकशाही मार्गाने प्रशासनाला धारेवर धरले आहे. ज्या प्रमाणे केरळ, तामिळनाडू राज्यात मच्छीमारांना मदतीचा हात दिला जातो. हे उदाहरणादाखल मत्स्यविकास मंत्री, आयुक्त यांना दाखवूनही प्रशासन व मंत्री ढिम्म असल्याचेही अ‍ॅड. चेतन पाटील यांनी सांगितले.

आर्थिक मदतीचा हात

राज्य शासनाकडून मदतीचा हात मिळत नाही. म्हणून आमदार रमेश पाटील यांनी लॉकडाऊन काळात सहा जिल्ह्यांतील हजारो गरजू मच्छीमारांना धान्य पुरविले. निसर्ग वादळात नुकसान झालेल्या मच्छीमारांना अलिबाग येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सहा जिल्ह्यांतील मच्छीमारांना शेत पेट्या, घराचे पत्रे, बॅटर्‍या, जाळे व स्वतःच्या खिशातून आर्थिक मदतीचा हात दिला.

आम्ही राज्य शासनाला विविध मार्गाने मच्छीमारांच्या शेकडो समस्या दाखवल्या, परंतु यावर अपेक्षित अशी कार्यवाही होत नाही. यामुळे मच्छीमार मेटाकुटीला आले आहेत. आता जर मच्छीमारांना आर्थिक मदत केली नाही तर शासनाला जागे करण्यासाठी लवकरच आक्रोश मोर्चा काढला जाईल. याची राज्य शासनाने नोंद घ्यावी.   

-रमेश पाटील, आमदार

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply