कर्जत : प्रतिनिधी
कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर कल्याण दिशेकडे सुरू असलेल्या शेडचे काम मे 2021 ला पूर्ण होईल, असे रेल्वे प्रशासनाने कर्जत येथील पंकज ओसवाल यांना कळविले आहे. मात्र कोरोनामुळे ठेकेदाराला मजूर मिळत नसल्याने या शेडच्या कामाला विलंब होत आहे. असे मुंबई येथील रेल्वेचे अधिकारी आशुतोष गुप्ता यांनी कर्जतमधील सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांना लेखी कळविले आहे.
कर्जत रेल्वे स्थानकातील फलाटांवर शेड उभारणीचे कित्येक दिवसापासून काम सुरू आहे. ते कधी पूर्ण होईल, या बाबतीत प्रवासी वर्गात चर्चा सुरू आहे. हे काम खूपच मंद गतीने सुरू असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत. या बाबतीत सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनास 15 नोव्हेंबर 2019 रोजी कर्जत रेल्वे स्थानकातील शेडचे काम केव्हा पूर्ण होईल? याबद्दल विचारणा केली होती. रेल्वे प्रशासनाने सदर काम मार्च 2020 अखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे, असे 02 डिसेंबर 2019 कळविले होते. यावर ओसवाल यांनी 04 डिसेंबर 2019 ला रेल्वे प्रशासनास सदर कामाच्या निविदेप्रमाणे सदर काम केव्हा पूर्ण झाले पाहिजे होते आणि सदर काम निविदेमध्ये ठरवून दिलेल्या तारखेपर्यंत पूर्ण होत नसेल तर या कामाला उशीर का होत आहे? त्याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी विचारणा केली होती. रेल्वे प्रशासनाने 16 डिसेंबर 2019 ला ओसवाल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना, निविदेप्रमाणे हे काम 13 ऑगस्ट 2019 पर्यंत पूर्ण झाले पाहिजे होते. तसेच मध्यंतरी जोरदार पाऊस झाल्यामुळे व त्या जागेमध्ये पाणी साचल्यामुळे सदर कामांसाठी विलंब झाला आहे, असे रेल्वे प्रशासनाने काळविले होते. सदर कामांसाठी जसा निधी उपलब्ध होईल, त्याप्रमाणे काम केले जाणार आहे, असे मध्य रेल्वेचे आशुतोष गुप्ता यांनी ओसवाल यांना कळविले होते.
ओसवाल यांनी 05 ऑगस्ट 2020 रोजी या बाबतींत रेल्वे प्रशासना पुन्हा विचारणा केली असता, रेल्वे प्रशासनाने 14 ऑगस्ट 2020 रोजी ओसवाल यांना सदर काम हे मार्च 2021 पर्यंत पूर्ण होईल, असे कळविले होते. परंतु मार्च 2021 संपत आला असताना सदर कामाची काहीच हालचाल दिसत नसल्याने ओसवाल यांनी पुन्हा रेल्वे प्रशासनाकडे 18 मार्च 2021 रोजी याबद्दल विचारणा केली असता, रेल्वे प्रशासनाने 5 एप्रिल 2021 ला सुरु होऊन मे 2021 ला पूर्ण होईल. तसेच कोरोनामुळे ठेकेदाराला मजूर मिळत नसल्यामुळे कामाला उशीर होत असल्याचेही कळविले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper