Breaking News

मनोआरोग्यावरही भर हवा

निव्वळ आत्महत्याच नव्हे तर एकंदरीतच देशातील लोकांमध्ये सर्वसाधारण मानसिक आजारांचे प्रमाण वाढते आहे असे अनेक सर्वेक्षणांतून समोर आले आहे. गुरुवारच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने अनेक तज्ज्ञांनी याकडे लक्ष वेधले. देश अनेक स्तरांवर बदलांना तोंड देतो आहे. एकीकडे शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती व विकास होताना दिसतो आहे. ग्रामीण भागातील जनता प्रचंड संख्येने शहरांकडे स्थलांतरित होते आहे.

टीबीने ग्रस्त ओलाचालकाने पत्नीसोबतच्या वादाला कंटाळून नैराश्याच्या भरात आपल्या दोन मुलांची हत्या केल्याची बातमी गुरूवारी बहुतेक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली. आईने किंवा वडिलांनी रागाच्या वा नैराश्याच्या भरात मुलांची हत्या करणे, आर्थिक विवंचनेतून कुटुंबप्रमुखाने पत्नी व मुलांची हत्या करून स्वत:ही आत्महत्या करणे अशा स्वरुपाची प्रकरणे अलीकडे निश्चितपणे वाढीस लागलेली आहेत. मागच्या वर्षी प्रकाशित काही अहवालांनुसार जगभरातील जवळपास एक तृतियांश आत्महत्या या भारतात होतात. भारतात 15 ते 29 या तरुण वयोगटातील व्यक्तींमध्ये आत्महत्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. अर्थातच शैक्षणिक ताणतणावांचा त्याच्याशी मोठा संबंध आहे. जागतिकीकरण व चंगळवादामुळे मानसिक समस्या वाढतील असा इशारा मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी आधीच दिला होता. परंतु आपल्या भरभक्कम कुटुंबपद्धतीवर आपली भिस्त होती आणि त्यामुळेच मानसिक आरोग्य वा संबंधित तक्रारींवर तज्ज्ञ डॉक्टरांना जाऊन भेटणे वा औषधे घेणे याला भारतीय समाजाकडून तितकेसे समर्थन आजही मिळत नाही. मानसोपचार तज्ज्ञांशी बोलणे वा मानसिक तक्रारींवर औषधे घेणे जितक्या मोठ्या प्रमाणात युरोप-अमेरिकेत आढळते तसे आपल्याकडे दिसत नाही. परंतु त्याचवेळेस देशातील 2.7 टक्के जनता नैराश्यासारख्या मानसिक समस्येने ग्रासलेली आहे असे नामवंत संस्थांकडील आकडेवारीवरून दिसते. परंतु यापैकी किती जण त्यावर उपचार घेण्याकडे वळतील हा प्रश्नही आहेच. बदलत्या जागतिक आर्थिक परिस्थितीच्या रेट्यात अनेकांवरील मानसिक ताण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जगण्यातील दैनंदिन धकाधकीमुळे ताणतणावाचे प्रमाण वाढते आहे. त्यातच दोन व्यक्तींमधील प्रत्यक्ष संवादाची जागा समाजमाध्यमांकडून बळकावली जाते आहे. आपल्याला किती लाइक्स मिळाल्या वा मिळाल्या नाहीत याने अनेक जण व्यथित होतात व त्यांचे मानसिक आरोग्य त्याच्याशी निगडित होऊन जाते. व्यक्तीच्या भावविश्वात कुटुंब संस्थेचे स्थान पूर्वीसारखे राहिलेले नाही. अधिकाधिक व्यक्तिवादी जीवनपद्धती, तंत्रज्ञानावरील वाढती भिस्त आदींमुळेही लोक नैराश्याच्या गर्तेत अडकत आहेत. थायरॉइडसंबंधी विकार, मधुमेह वा कुठल्याही दीर्घकाळ दाद न देणार्‍या विकाराने ग्रस्त व्यक्तीला नैराश्याचा त्रास जाणवू शकतो. दिल्लीतील एम्समध्ये दहा वर्षांपूर्वी मानसिक विकाराने त्रस्त 100 रुग्ण रोज येत असत तर आता 300-400 येतात. अर्थात लोकांमध्ये उपचारांसंबंधी जागरुकता वाढल्याचाही हा परिणाम आहे. किशोरवयीन मुलांवरही आज अभ्यासाखेरीज अन्य अ‍ॅक्टिव्हिटीजचा कमालीचा ताण दिसतो. समाजमाध्यमांवर सतत नवनवीन फोटो टाकणे, त्यांना मित्रमंडळींकडून लाइक्स मिळवणे या सार्‍यानेही तणावात भरच पडते. अमेरिकेसारख्या देशात 60-70 हजार मनोचिकित्सक आहेत तर आपल्याकडे ही संख्या जेमतेम 4 हजार असावी असा अंदाज आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply