संभाजीराजेंचा इशारा
पुणे ः प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेत आता संभाजीराजे यांनी मराठा क्रांती मोर्चाची हाक दिली आहे. 16 जूनला कोल्हापूरमधून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यातून त्यांनी इशारा दिला आहे.
संभाजीराजे यांनी ही पोस्ट शेअर करताना ’वादळापूर्वीची ही शांतता’, असे म्हटले आहे. हे आंदोलन मूक असून 16 जूनपासून सुरू होणार आहे. ’आम्ही बोललो, आता तुम्ही बोला’, असे या आंदोलनाचे घोषवाक्य असून आंदोलनाच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातील आमदार, खासदारांना बोलावून भूमिका मांडण्याची विनंती केली जाणार आहे.
या मूक आंदोलनाची राज्य सरकारने दखल न घेतल्यास मुंबईत विराट लाँग मार्च काढला जाईल आणि तो सरकारला परवडणारा नसेल, असा इशारा संभाजीराजेंनी दिलेला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी कोल्हापुरात समन्वयकांची बैठकही घेतली होती.
RamPrahar – The Panvel Daily Paper