रेवदंडा : प्रतिनिधी
रायगड जिल्हा मल्लखांब असोसिएशनच्या मान्यतेने श्री राम स्पोर्ट्स असोसिएशन सागमळा आयोजित पाच दिवसीय तिसरे मल्लखांब व लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर शनिवार, दि. 11 ते बुधवार, दि. 15 मे या कालावधीत झाले.
श्री राम स्पोर्ट्स असोसिएशन सागमळा येथील मैदानात आयोजित मल्लखांब व लाठीकाठी प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. प्रांरभी रायगड जिल्हा
मल्लखांब असोसिएशनचे पदाधिकारी शिरिष नाईक यांचे स्वागत पुष्पगुच्छ प्रदान करून करण्यात आले. त्यानंतर प्रमुख अतिथी हर्षद हिंगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तिसर्या मल्लखांब व लाठीकाठी प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. या पाच दिवसीय मल्लखांब व लाठीकाठी प्रशिक्षण शिबिरामध्ये एकूण 125 प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. यामध्ये लहान व मोठी मुले व मुलींचा सहभाग होता.
या मल्लखांब व लाठीकाठी प्रशिक्षण शिबिराचा समारोप बुधवारी (दि. 15) सायकांळी 5 वाजता झाला. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून चौलचे प्रसिद्ध बागायतदार व सामाजिक कार्यकर्ते द. प. ठाकूर यांची उपस्थिती होती. या वेळी प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण शिबिरात शिकविण्यात आलेले मल्लखांब व लाठीकाठीचे प्रात्यक्षिक दाखवत उपस्थित मल्लखांब व लाठीकाठी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली व त्यांची दादही मिळवली.या शिबिरात सहभागी असलेल्या मुलींमध्ये अनघा विजय पिटनाईक, ईश्वरी राजेंद्र घरत व मुलांमध्ये साक्षात रवींद्र घरत व जिंदनेश प्रवीण शेणवईकर यांची उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी, तसेच उत्कृष्ट प्रशिक्षक समीक्षा नरेश नाईक व सुचित नरेश नाईक यांना मान्यवर उपस्थितांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हे मल्लखांब व लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यासाठी रायगड जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे पदाधिकारी शिरिष नाईक व श्री राम स्पोर्ट्स असोसिएशन सागमळाचे सर्व मल्लखांबपटू यांनी विशेष परिश्रम घेतले.
RamPrahar – The Panvel Daily Paper