रोम जळत असताना निरो फिडल वाजवित होता. तशाच प्रकारे महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होऊन लोकांचा जीव जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘मातोश्री’त बसून आहेत. अशा परिस्थितीत विरोधी पक्ष भाजपकडून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात असताना तेसुद्धा राज्य सरकार करू देत नाहीए. ही अडवणूक नाही तर काय…
कोरोनाच्या दुसर्या लाटेत महाराष्ट्राची अवस्था बिकट झाली आहे. अनेक रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नाहीत. कुठे बेड मिळालाच तर ऑक्सिजन नाही अशी भयंकर परिस्थिती आहे. त्यामुळे उपचाराअभावी लोकांचा अक्षरश: बळी जात असल्याची विदारक वस्तुस्थिती आहे. अशा वेळी पुढे सरसावून जनतेला दिलासा देण्याची, आवश्यक ती मदत करण्याची गरज आणि जबाबदारी असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकार मात्र हे नाही, ते नाही अशी रडकथा लावून हातावर हात देऊन बसलेय आणि वर केंद्र सरकारकडे बोट दाखवून राजकारणही करीत आहे. कोरोना महामारीत राज्याचे मुख्यमंत्री खुद्द उद्धव ठाकरे ‘मातोश्री’च्या पिंजर्यात आहेत. खरेतर संकटकाळात राज्याच्या प्रमुखाने आघाडीवर राहून लढायचे असते. त्याचवेळी जनतेला आधार, धीर द्यायचा असतो. दुर्दैवाने यात मुख्यमंत्री सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र आहे, तर त्याचे सहकारी मंत्री बेताल विधाने करून वातावरण अधिकच बिघडवित आहेत. वास्तविक या गंभीर परिस्थितीत विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन मार्ग काढायला हवा. राज्यातील विरोधी पक्ष भाजपची केंद्रात सत्ता आहे. त्यामुळे येथील भाजप नेत्यांच्या सहकार्याने अधिकाधिक औषधे व अन्य सुविधा केंद्राकडून महाराष्ट्राला कशा मिळतील यासाठी पावले उचलता आली असती, मात्र त्याचे श्रेय भाजपला मिळू नये म्हणून उदासिनता दिसून येत आहे. राज्याला कोरोनावर उपयुक्त असणार्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा जास्तीत जास्त साठा उपलब्ध व्हावा यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी गुजरातमधील काही कंपन्यांशी संपर्क साधून चर्चा केली. त्यानुसार तेथून रेमडेसिवीरचे 50 हजार डोस महाराष्ट्राला मिळणार आहेत. या अनुषंगाने विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांनी दमणचा दौराही केला होता. तेव्हापासून मविआ सरकारचा थयथयाट सुरू झाला. या सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी तर महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्यास औषध कंपन्यांवर कारवाई करण्याची धमकी केंद्र सरकारने दिल्याचा आरोप करून सनसनाटी माजविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. अर्थात, भाजप नेत्यांनी त्यास चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आता ब्रुक फार्मा कंपनीच्या अधिकार्याला विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतले. मंत्र्याच्या ओएसडीने राजेश डोकानिया या अधिकार्याला फडणवीस आणि दरेकरांच्या म्हणण्यावर तुम्ही इंजेक्शन्सची निर्यात कशी करू शकता, असा जाब विचारला. एवढेच नव्हे तर रात्री 10 वाजता पोलीस घरी गेले आणि त्यांना उचलून घेऊन आले. यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाला असून फडणवीस, दरेकर यांनी पोलीस यंत्रणा आणि सरकारला फैलावर घेतले आहे. मुळात राज्य सरकार स्वस्थ बसले असताना विरोधी पक्ष भाजप काही प्रयत्न करीत असेल तर अशा प्रकारे अडवणूक करण्यात काय अर्थ आहे. अरे इथे लोकांचा जीव जातोय. राज्य सरकारला तेच हवे आहे का? तसे असल्यास महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही हे लक्षात ठेवा!
RamPrahar – The Panvel Daily Paper