स्पाचा चालक, मालक पोलिसांच्या ताब्यात
पनवेल : वार्ताहर
स्पा आणि मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविणार्या खारघर सेक्टर-7 मधील ओश्यानिक स्पा अॅन्ड सलुनवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकला. या कारवाईत मसाज पार्लरचा चालक, मालक या दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत 5 महिलांना ताब्यात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली आहे. खारघर सेक्टर-7 मधील रावेची हाईट्स इमारतीतील ओश्यानिक स्पा अॅन्ड सलुनमध्ये बॉडी मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग सोनवणे व त्यांच्या पथकाने ओश्यानिक स्पा अॅन्ड सलुनमध्ये एक बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. यावेळी स्पामध्ये वेश्याव्यवसाय चालविण्यात येत असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांच्या पथकाने सदर स्पावर छापा टाकला. यावेळी 5 महिलांकडून मसाजच्या नावाखाली वेश्याव्यसाय करुन घेण्यात येत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या महिलांकडे केलेल्या चौकशीत स्पा चालक व मालक हे बॉडी मसाजच्या बहाण्याने ग्राहकांसोबत वेश्यागमन करण्यास सांगत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी स्पा अॅन्ड सलुनचा चालक भिमाराम माळी व स्पा मालक विमल परमार या दोघांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन दोघांना ताब्यात घेतले.
RamPrahar – The Panvel Daily Paper