ईडीच्या कारवायांविरोधात काँग्रेस पक्षातर्फे देशभर आंदोलने करण्यात आली खरी, परंतु त्याला पुरेशी धार नव्हती. अखेर ईडीचा मुद्दा थोडा मागे टाकून महागाईच्या आडोशाआड दडून कुटिल कारवाया करण्याचे उद्योग काँग्रेस नेत्यांनी आता सुरू केले आहेत. शुक्रवारी त्याचे प्रत्यंतर आले. सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने सुरू केलेल्या चौकशीचे निरनिराळे पडसाद भारताच्या राजकारणात बघायला मिळत आहेत. काही वर्षांपूर्वी ईडी म्हणजे काय हे देखील कोणाला माहित नव्हते अशी टीका मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांतर्फे उपहासाने केली जात होती. परंतु विरोधकांच्या या प्रतिक्रियेत तथ्य मात्र नक्कीच आहे. कारण काही वर्षांपूर्वीपर्यंत ईडी हे प्रकरण फारसे कोणाला खरोखरच माहित नव्हते. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले तेव्हापासून ईडीचे चटके काही जणांना बसू लागले आहेत. भ्रष्टाचाराबाबत सहनशीलता आणि सहानुभूती दाखवली जाणार नाही अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी सुरूवातीलाच दिली होती, त्यानुसारच भाजप सरकारची पावले पडत आहेत. जनतेला हेच हवे होते आणि त्यासाठीच सत्तापालट करून पंतप्रधानपदी मोदी यांची निवड करण्यात आली होती. गेल्या तीन-चार वर्षांत मात्र या ईडीनामक तपासयंत्रणेने भल्याभल्यांच्या झोपा उडवल्या आहेत. महाराष्ट्रात ईडीच्या कारवाईमुळे मंत्रीमहोदय गजाआड झाले आणि एका राजकीय पक्षाचा प्रवक्ता बराच काळ भोंगा वाजवल्यानंतर ईडीच्या कोठडीत रवाना झाला आहे. राष्ट्रीय पातळीवर नॅशनल हेराल्ड प्रकरणी थेट गांधी परिवारालाच ईडीच्या तपास अधिकार्यांनी आरोपाच्या फेर्यात घेरले आहे. काही दिवसांपूर्वी नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांची ईडीने तीन दिवस चौकशी केली होती. त्याआधी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचीही कसून चौकशी झाली होती. या दोघांच्याही आधी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वडेरा यांचे पती रॉबर्ट वडेरा यांना देखील ईडीच्या मुख्यालयात चौकशीसाठी वार्या कराव्या लागल्या होत्या. गांधी परिवाराशी संबंधित कुणालाही ईडीच्या तपासाचे समन्स आले की काँग्रेस जन चवताळून रस्त्यावर उतरतात. दरवेळी असेच घडत आले आहे. वास्तविक तपासयंत्रणांना सहकार्य करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. परंतु सहकार्य सोडाच एका परिवाराला वाचवण्यासाठी संसद वेठीला धरण्यापर्यंत काँग्रेस खासदारांची मजल गेली. पुन्हा ईडीचा मुद्दा मागे टाकून महागाईच्या मुद्दयावर काँग्रेसतर्फे शुक्रवारी काळा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले. अपेक्षेप्रमाणे त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. राजधानी दिल्लीत मात्र गांधी परिवाराच्या सदस्यांनी काळे कपडे परिधान करून तुरळक कार्यकर्त्यांसह आंदोलन छेडण्याचे नाटक केले. प्रियांका गांधी यांनी तर पोलिसांचा वेढा मोडून बॅरिकेडवर चढून ठिय्या आंदोलन केले. त्यांना ताब्यात घेताना महिला पोलिसांना बरीच कसरत करावी लागली. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना देखील दिल्ली पोलिसांनी काँग्रेस मुख्यालयाबाहेरच ताब्यात घेतले. काँग्रेसचे दुसरे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांना देखील ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. संसद चालू असताना अशा प्रकारे समन्स बजावणे अन्यायकारक आहे अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. परंतु ईडीसारखी स्वायत्त तपास यंत्रणा आरोपीची सोय बघून कारवाया करत नसते हे खरगे यांना माहित असायला हवे होते. महागाईबद्दल काँग्रेसला आलेला पुळका म्हणूनच खोटा आणि बेगडी वाटतो आहे.
महागाईचा आडोसा
Ramprahar News Team 5th August 2022 महत्वाच्या बातम्या, संपादकीय Leave a comment 212 Views
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper