

महाड ़: प्रतिनिधी
भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने मंगळवारी (दि. 26) महाड तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयात संविधान दिनाच्या कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले. येथील महसूल तसेच पंचायत समिती कार्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी राष्ट्राला अर्पण करण्यात आले. यामुळे दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. महाडमधील तहसील, उपविभागीय अधिकारी, कृषी, महाड पंचायत समिती कार्यालय तसेच विविध प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये राज्यघटनेतील प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले. तहसीलदार चंद्रसेन पवार यांच्यासह सर्व कर्मचार्यांनी यावेळी संविधानाची शपथ घेतली. पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी प्रमोद गोडांबे यांच्यासह सर्व कर्मचार्यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. ग्रामीण भागात विविध ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेण्यात आल्या. तर प्राथमिक शाळांमधूनदेखील संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून शपथ घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व पटवून देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्येदेखील संविधान दिन साजरा झाला. यावेळी भारतीय संविधानावर प्रा. विजयकुमार पाईकराव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रभारी व्यवस्थापक प्रकाश जमदाडे, प्रकल्प अधिकारी मिलिंद इंगळे, जनसंपर्क अधिकारी लीना कांबळे आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper