महाड : प्रतिनिधी – कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव आणि संक्रमण रोकण्यासाठी महाड नगरपालिकेने लोकांची भाजी खरेदीसाठी एकाच ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी शहराच्या चार भागात भाजी आणि फळ विक्रीचे झोन केले आहेत. नागरिकही या योजनेला प्रतिसाद देताना दिसत आहेत.
कोरोना व्हायरसचा प्रसार आणि संक्रमण रोकण्यासाठी संपुर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र तरी देखील खरेदीसाठी लोक गर्दी करत आहेत. ही गर्दी टाळण्यासाठी महाड नगरपालिकेने महाड शहराचे चार भाग केले असुन, त्या त्या भागातील नागरिकांनी ठरवून दिलेल्या भागातच जावुन भाजी खरेदी करायची आहे. यामध्ये प्रभात कॉलनी, कुंभार आळी, विरेश्वरमंदिर परिसर यांच्यासाठी मनपा शाळा क्रमांक 2चे मैदान, नवेनगर, रोहीदास नगर या भागांसाठी शाळा क्रमांक 5चे मैदान, चवदार तळे, सरेकरआळी, गवळआळी, पानसारमोहल्ला यांच्यासाठी शाळा क्रमांक 4 चे मैदान, काकरतळे, उभामारुती, कोटेश्वरीतळे या भागासाठी भिलारे मैदान या ठिकाणी भाजी आणि फळ विक्री सुरू करण्यात आली आहे. ही मैदाने विस्तीर्ण आहेत, तसेच उभे राहण्यासाठी चौकोन आखुन दिल्यामुळे बाजारात होणारी गर्दी यामुळे टाळता येणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper