Breaking News

महात्मा फुले महाविद्यालयात पदवीदान समारंभ; मान्यवरांची लाभली उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शनिवारी (दि. 26) पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आणि महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे माजी सचिव डॉ. जे.जी. जाधव यांची उपस्थिती लाभली.
समारंभास माजी विद्यार्थी मंडळाचे माजी अध्यक्ष महेंद्र घरत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, उपप्राचार्य डॉ. आर.ए. पाटील, डॉ. एन.बी. पवार, वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख प्रा. जे.बी. वारघडे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर सेवकवर्ग, विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व विषद करीत जीवनामध्ये यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला. आजच्या युगामध्ये टिकून राहायचे असेल तर कष्ट केल्याशिवाय फळ नाही. मेहनत घेऊन शिकणारे विद्यार्थी यशाची गरूडझेप घेतात, असे ते म्हणाले तसेच विद्यार्थ्यांनी आवडीचे क्षेत्र निवडल्यास त्यांना प्रगती व यश नक्की मिळेल, असे नमूद केले.
आजच्या स्पर्धेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच अंगी कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे; त्याचबरोबर आपल्या भावी आयुष्यात समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन वाटचाल करायला हवी, असा मोलाचा सल्लाही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
डॉ. जे.जी. जाधव यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी कर्मवीर अण्णांच्या जीवन चरित्रातून प्रेरणा घेतली पाहिजे तसेच आपल्या वर्तनातून विद्वत्ता सिद्ध करावी. समाजासमोर तुमची विद्वत्ता व तुमच्यातील गुण येणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धेला न घाबरता त्याला सामोरे गेले पाहिजे, असेही ते म्हणाले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी उपस्थितांचे स्वागत केले व संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा प्रास्ताविकात घेतला.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील पदवीधर व पदव्युत्तर स्नातकांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण गायकर, डॉ. प्रफुल्ल वशेणीकर व प्रा. डॉ. वाय.एच. उलवेकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उपप्राचार्य प्रा. डॉ. राजाराम पाटील यांनी मानले.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply