जि. प. सीईओ डॉ. किरण पाटील यांचे आवाहन
अलिबाग : प्रतिनिधी
महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य महान आहे. ते कोण्याएका समाजाचे नव्हते. त्यांची जयंती शासनाच्या सर्व विभागांनी एकत्रित येऊन सर्व सामाजातील लोकांना घेऊन साजरी केली पाहिजे. त्यांचे विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवले पाहिजेत, असे मत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 जयंती निमित्त सामाजिक न्याय विभागा तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक न्याय सहाय्यक आयुक्त कार्यालय आणि रायगड जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जयंती कार्यक्रमात डॉ. किरण पाटील बोलत होते. रायगड जिल्हा परिषदेच्या ना. ना. पाटील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, राजेंद्र भालेराव, कृषि अधिकरी लक्ष्मण कुरकुटे, शिक्षणाधिकरी ज्योत्स्ना शिंदे, समाजकल्याण अधिकारी गजानन लेंडी, सामाजिक न्याय विभागाचे रायगड जिल्हा सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव आदी उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचे सामाजिक कार्य या विषयावरील व्याख्यानात डॉ. पी. बी. आचार्य व निवृत्त प्राध्यापक शाम जोगळेकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. सुनील जाधव यांनी प्रास्ताविक केले. अमरदीप ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper