कर्जतमधील सत्कार सोहळ्यात खा. श्रीरंग बारणे यांचे प्रतिपादन

कर्जत : बातमीदार
मावळ लोकसभा मतदारसंघात आपण थेट अजित पवारांचा आणि पवार कुटुंबाचा पराभव करून विजय मिळविला आहे. हे महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळे शक्य झाले आहे. या निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी दोन पावले पुढे जाऊन काम केले, असे सांगून खासदार बारणे यांनी आगामी काळात विकासकामे करताना भाजप आणि आरपीआयला समान निधी देण्याचे काम केले जाईल, असे आश्वासन कर्जत येथे गुरुवारी दिले. कर्जत विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीच्या वतीने येथील रॉयल गार्डन हॉटेलच्या सभागृहात मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांचा गुरुवारी सत्कार करण्यात आला. त्यावेळी झालेल्या सोहळ्यात खासदार बारणे सत्काराला उत्तर देत होते. आपण सर्वांनी पाठबळ दिल्यामुळे पुन्हा खासदार झालो. त्यामुळे संसदेत काम करण्याची पुन्हा संधी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जत, खोपोली, माथेरान आणि नेरळ या शहरी भागाने आपल्याला मताधिक्य देत ते कोणाच्या दादागिरीला भीक घालत नाही हे दाखवून दिले. निवडणुकीच्या काळात पवारांच्या राष्ट्रवादीने टीम उतरवली होती, मात्र त्यांना न घाबरता महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचा आपल्याला अभिमान असल्याचे खासदार बारणे यांनी स्पष्ट केले. खासदार बारणे यांच्या रूपाने मावळ लोकसभा मतदारसंघाने कायम भगव्याला साथ दिली आहे. त्यामुळे कोणी कितीही परिवार उतरवले तरी महायुतीला कोणीही रोखू शकत नाही, हे दाखवून देण्याचे काम महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केले. जनतेनेही आपल्या देशाची, राष्ट्रीयत्वाची निवडणूक आहे, असे समजून स्वतःहून मतदानकेंद्र गाठले आणि आपल्या खासदारांना विजयी केले, असे प्रतिपादन भाजपचे कर्जत विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष माजी आमदार देवेंद्र साटम यांनी या वेळी केले. खासदार श्रीरंग बारणे यांचा विजय हा महायुतीचे कार्यकर्ते आणि मतदार यांच्यामुळे झाला असल्याचे रायगडचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर यांनी सांगितले. मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी, आरपीआयचे तालुका अध्यक्ष राहुल डाळिंबकर, शिवसेना मतदारसंघ अध्यक्ष संतोष भोईर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर यांचीही या वेळी समयोचित भाषणे झाली. सुरुवातीला खासदार बारणे यांचा कर्जत तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे यांनी प्रास्ताविक केले. जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, भाजपचे जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कल्पना दास्ताने, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक रेखा ठाकरे, कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, शिवसेना तालुका प्रमुख संभाजी जगताप, भाजप तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, सुनील गोगटे, भाई गायकर, भरत भगत, राजेश जाधव, अमर मिसाळ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper