
जळगाव ः प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. महाराष्ट्र राज्याला अनेक थोर राष्ट्रनेत्यांचा वारसा असून आपले राज्य हे या विचारांचा वारसा जपणारे राज्य आहे. त्यामुळेच राज्याने विविध क्षेत्रांत प्रगती करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर संपन्न झाला. या वेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना पाटील बोलत होते. या वेळी महापौर सीमा भोळे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांसह स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी-कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, आपल्या महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. महाराष्ट्राचा धार्मिक, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी असून, राज्याचे विविधांगी भावविश्व थक्क करणारे आहे. महाराष्ट्र ही संत-महंत, ऋषिमुनींची जशी भूमी आहे, तशीच ती शूरवीरांचीही भूमी आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची आणि देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. महाराष्ट्र हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले, सामाजिक समतेचा पाया रचणारे छत्रपती शाहू महाराज, भारताला लोकशाहीची देण देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व थोर राष्ट्रनेत्यांच्या विचारांचा वारसा जपणारे राज्य असल्याचेही ते या वेळी म्हणाले. पोलीस कवायत मैदान येथे सकाळी आठ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शानदार संचलन करण्यात आले. त्यात जिल्हा पोलीस दल, होमगार्ड पुरुष व महिला पथक, शहर वाहतूक शाखा, बॉम्बशोधक पथक, पोलीस बॅण्ड पथक, वरुण पथक, जळगाव शहर महानगरपालिकेचे अग्निशमन पथक, निर्भया पथकांनी संचलनात सहभाग घेतला. या संचलनाचे नेतृत्व कमांडिग ऑफिसर भुसावळ उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी केले, तर सेकंड कमांडिग ऑफीसर राखीव पोलीस निरीक्षक सुभाष कावरे हे होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper