पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकार रोज घोषणा करते आणि मागे जाते. म्हणून हे पलटूराम सरकार आहे. रोज आश्वासन देतात, मात्र त्या आश्वासनावर टिकून राहात नाहीत. गेल्या वर्षभरात राज्यातील चालू कामांना या सरकारने स्थगिती दिली. महाराष्ट्र स्थगित केला, बंद पाडला. यापेक्षा कुठलेही कर्तृत्व या सरकारचे नाही, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते बुधवारी (दि. 25) पुण्यात बोलत होते. या सरकारने एकही नवे काम महाराष्ट्राच्या हिताचे केले नाही. केवळ बदल्या करा आणि माल कमवा हे सुरू आहे. या सर्वांमुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, असेही फडणवीस यांनी या वेळी म्हटले.
भाजपचे पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार संग्राम देशमुख व पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ चिंचवड येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना फडणवीस बोलत होते. आमदार आणि भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
देशातील नागरिकांना कर्मयोगी आवडतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्मयोगी आहेत, ते कर्म करतात. नागरिकांना बोलघेवडे लोक आवडत नाहीत जे केवळ बोलतात, पण करीत काहीच नाहीत. कोरोनाच्या काळात महाराष्ट्र सरकारने एक नव्या पैशाची मदत कोणाला केली नाही. समाजातील कुठल्याही घटकाला फुटक्या कवडीची मदत यांनी केली नाही, असे म्हणत फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
फडणवीस पुढे म्हणाले की, कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारत पॅकेजद्वारे प्रत्येकाच्या घटकाला आधार दिला. देशातील छोट्या छोट्या राज्यांनीही आर्थिक पॅकेज तयार केले. गरीब आणि मध्यमवर्गीयांपर्यंत ते पोहचवण्याचा प्रयत्न केला. देशातील सर्वांत समृद्ध राज्य म्हणून महाराष्ट्रला ओळखले जाते, मात्र येथे एका फुटक्या कवडीची मदत केली नाही. केवळ तुम्ही तुमच्या घरी राहा आणि कुटुंब सांभाळा. आम्ही आमच्या घरी राहतो आणि आमचं कुटुंब संभाळतो याच्या व्यतिरिक्त कुठलेही काम महाराष्ट्रात झाले नाही.
सरकारला मतांचा शॉक द्या!
कोविड महामारीत राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीज बिले आली. या विरोधात आम्ही पहिल्यांदा आंदोलन केले. संपूर्ण महाराष्ट्रातील बिले जमा केली. दोन खोल्यात राहणार्यांना 30 हजारांचे बिल आले. सरकारला ही बिले दाखवली. त्यावर मंत्र्यांनी बिल सुधारून देऊ आणि बिलात सवलतदेखील देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर काही कालावधी निघून गेल्यावर वीज बिल सवलत मिळणार असल्याचे पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आले. मग सात दिवसानी राज्याचे ऊर्जामंत्री म्हणाले, वीज वापरली तर पैसे भरावे लागतील. कोणाला एक पैशाची सवलत मिळणार नाही असे सांगतात. त्यानंतर ऊर्जामंत्री म्हणतात, ज्या वेळी घोषणा केली तेव्हा माझा अभ्यासच झाला नव्हता. हे कुठला अभ्यास करतात हे मलादेखील समजत नाही. आता म्हणतात कुठल्याही प्रकारची सूट देता येणार नाही. ज्या सरकारने नागरिकरांना विजेचा शॉक दिला त्या सरकारला मतांचा शॉक देऊन त्यांना जाग करण्याची संधी आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून मिळाली आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी नमूद केले.
Check Also
ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …
RamPrahar – The Panvel Daily Paper