भाजपने केली मध्यस्थी
ठाणे ः प्रतिनिधी
मागील दोन दिवसांपासून स्थायी समितीत अर्थसंकल्पावरील चर्चा सुरू आहे, मात्र शुक्रवारी (दि. 12) ही चर्चा सुरू असताना महाविकास आघाडातील काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांत थेट अंगावर खुर्ची फेकेपर्यंत राडा झाला, तसेच शिवीगाळ व शाब्दिक चकमकही झाली. या वेळी सभागृहात महिला सदस्यही उपस्थित होत्या, परंतु हे सदस्य त्याचेही भान विसरल्याचे दिसले. अखेर यात मध्यस्थी करून भाजपने शिवसेना व काँग्रेसमधील वाद शमविल्याचे दिसून आले. या राड्यानंतर मात्र ही चर्चा अर्धवट राहिली.
एकीकडे राज्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांत काही ना काही कुरबुरी सुरूच आहेत. त्यात ठाण्यातही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कुरबुरी वाढल्याचे दिसत आहे. एकीकडे आता आम्हाला खर्या अर्थाने विरोधी पक्षनेता भेटल्याचा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षनेतेदेखील शिवसेनेवर घसरल्याचे दिसत आहे. त्यामुळे या कुरबुरी सुरू असतानाच आता शुक्रवारी अर्थसंकल्पावरील चर्चा स्थायी समितीच्या बैठकीत सुरू होती. गुरुवारपासून ही चर्चा सुरू असून शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता पुन्हा चर्चा पुढे सरकत होती. त्यानंतर दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास सुरळीतपणे सुरू असलेल्या चर्चेस अचानक शिवीगाळीचे स्वरूप आल्याचे दिसून आले. काँग्रेसचा सदस्य वारंवार सभागृहात ये-जा करीत होता. त्यानंतर त्याला बोलण्याची संधी मिळाल्यावर त्याने 2018, 19 आणि 20च्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यास सुरुवात केली, परंतु जुने विषय का उगाळता, आताच्या बजेटवर चर्चा करा, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकाने केली. त्यावर काँग्रेसचा नगरसेवक आक्रमक झाला आणि मला जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे मला काय बोलायचे हे शिकवू नये, असा शाब्दिक टोला लगावला आणि येथूनच शिवसेना आणि काँग्रेसच्या दोन नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. ही चकमक एवढी भयंकर होती ती हे दोन्ही सदस्य सभागृहात महिला सदस्य आणि पालिकेच्या महिला अधिकारी आहेत याचेही भान विसरून एकमेकांना शिवीगाळ केल्याचे दिसून आले. त्यानंतर हा वाद वाढून काँग्रेसच्या नगरसेवकाने शिवसेनेच्या नगरसेवकावर थेट खुर्ची फेकण्याचा प्रयत्न केला.
RamPrahar – The Panvel Daily Paper