वर्षा ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन; माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हिरकणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षा प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 7) झाले.
उद्घाटन समारंभास आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, कैलास गावडे, माजी नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, प्रसेनजित कारलेकर, रविकिरण घोडके, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, सहाय्यक आयुक्त स्मिता काळे, डॉ. रूपाली माने, श्रीराम पवार, आदी उपस्थित होते.
या महोत्सवात बचत गटाच्या महिलांना उद्योग व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी 25 बचत गटांचे स्टॉल्स 7,8,9 मार्च असे तीन दिवस असणार आहेत. याचबरोबर महिलांच्या आरोग्याची काळजी घेत विशेष अशा आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात विविध तपासण्या व चाचण्या करण्यात येत आहेत.
महिलांसाठी स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक स्वयंसिद्धाच्या संचालिका, राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या तपस्वी गोंधळी व सहकार्यांनी सादर केले, तर आजकाल होणार्या सायबर फसवणुकीपासून आपला बचाव व्हावा याकरिता नवी मुंबईतील सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी मार्गदर्शन केले. यानंतर अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी महिलांच्या सदृढ आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या. मेघना संजय कदम यांच्या प्राणिक हिलरव्दारे आपले मन आणि शरीर स्वस्थ ठेवणारा विशेष कार्यक्रम सादर केला.
दरम्यान, दुपारच्या सत्रात मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी या महोत्सवास सदिच्छा भेट दिली. शिवसेना महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, उपजिल्हाप्रमुख मंगेश रानवडे सोबत होते.
यानंतर खेळ पैठणीचा हा महिलांसाठीचा लोकप्रिय कार्यक्रम झाला. यामध्ये विजेत्या चार महिलांना पैठणीची विशेष भेट देण्यात आली. त्याचप्रमाणे महिलांसाठी गीत, संगीत, गायन, नृत्य, महाराष्ट्राची लोकसंस्कृती हा बहारदार कार्यक्रम सादर झाला. यात उपस्थित महिलांनाही सहभागी होऊन गाण्याच्या तालावर ठेका धरला.
RamPrahar – The Panvel Daily Paper