अलिबाग : प्रतिनिधी
गेट वे ऑफ इंडिया (मुंबई) ते मांडवा (अलिबाग) यादरम्यान प्रवासी वाहतूक करणार्या अजंठा कंपनीची प्रवासी बोट शनिवारी (दि. 14) सकाळी मांडव्याजवळ समुद्रात बुडाली. या बोटीतून प्रवास करणार्या 88 प्रवाशांचे प्राण पोलीस आणि खलाशांच्या तत्परतेमुळे वाचले.
अजंठा कंपनीची बोट 88 प्रवासी घेऊन शनिवारी सकाळी गेट वे ऑफ इंडिया येथून मांडव्याकडे येत होती. मांडवा जेटीपासून एक किलोमीटर अंतरावर असताना 10.15च्या सुमारास अचानक ही बोट बुडू लागली. त्यामुळे बोटीतून प्रवास करणारे पुरुष, महिला व लहान मुलांनी घाबरून आरडओरडा करू लागले.
बोट बुडत असल्याची माहिती बोटीवरील तांडेलने पोलिसांना व इतर बोटींना दिली. ही माहिती मांडवा पोलीस उपनिरीक्षक धर्मराज सोनके यांना मिळताच त्यांनी सागरी गस्तीवर निघालेल्या रायगड जिल्हा पोलीस दलातील सद्गुरू कृपा बोटीवरील नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी प्रशांत घरत यांना कल्पना दिली. ट्रॉलरवरील तांडेल व खलाशी यांना घेऊन ते बुडणार्या बोटीजवळ गेले.
सर्व प्रवासी जीव मुठीत धरून देवाचा धावा करीत होते. त्याचवेळी पोलीस आणि खलाशी त्यांच्या बचावासाठी धावून आले. त्यांनी सर्व प्रवाशांना दुसर्या बोटीत बसविले. बोट पोहोचण्यास उशीर झाला असता, तर 88 जणांना जलसमाधी मिळाली असती. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. मांडवा जेटीवर पोहोचताच या प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला, तसेच पोलिसांचे व खलाशांचे आभार मानले.
मांडवा पोलीस उपनिरीक्षक धर्मराज सोनके व कर्मचार्यांनी घटनास्थळी जाऊन सर्व प्रवाशांना मदत केली. बुडालेली बोट काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. या प्रकरणी अजंठा या बोटसेवा देणार्या कंपनीवर पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याचे सोनके यांनी सांगितले.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper