मुंबई : प्रतिनिधी
सध्या भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ मर्यादित षटकांच्या सामन्यांची मालिका खेळतो आहे. आगामी विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून ही मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या मालिकेत खेळत असलेल्या बहुतांश खेळाडूंची विश्वचषकाच्या संघात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारताचा कसोटी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेची विश्वचषक संघात वर्णी लागण्याची शक्यता कमीच आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत खेळत असताना अजिंक्यने याबद्दल नाराजी बोलून दाखवली. निवड समिती आणि संघ व्यवस्थापन जो निर्णय घेईल त्याचा मला आदर आहे, मात्र माझ्या कामगिरीची दखल घ्यायला हवी, असे अजिंक्य रहाणे म्हणाला.
एक फलंदाज म्हणून मी आक्रमक आहे, मात्र तो माझा स्वभाव नाही. बोलून दाखवण्यापेक्षा मी धावा काढून आपली बाजू मांडण्याला जास्त महत्त्व देतो. मी आतापर्यंत प्रत्येक वेळी संघाचा विचार पहिला केला आहे, यापुढेही करत राहीन, मात्र सरतेशेवटी तुमच्या कामगिरीची दखल घेतली जाणे महत्त्वाचे असते. अजिंक्यने आपली बाजू मांडली. याच वेळी अजिंक्यने आपल्याला वन-डे संघात सातत्याने संधी मिळाली नसल्याचेही म्हटले.
मला आतापर्यंत संघात सातत्याने संधी मिळाली नाही. ज्या वेळी संधी मिळाली त्या वेळी मी चांगली कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे किमान मी इतकी मागणी करूच शकतो, अजिंक्य बोलत होता. 2017 साली विंडीज दौर्यात अजिंक्यला मालिकावीराचा किताब मिळाला होता. गेल्या तीन-चार मालिकांमध्ये मी 45 ते 50च्या सरासरीने फलंदाजी केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper