माणगाव ः प्रतिनिधी
माणगाव तालुक्यातील पाणसाई आदिवासी वाडीत गावठी बॉम्बसह ते तयार करण्याचे साहित्य आढळले आहे. या प्रकरणी माणगाव पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पाणसई आदिवासी वाडीत बॉम्बचा साठा असल्याची माहिती माणगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने रविवारी (दि. 19) रात्री तेथे जाऊन पाहणी केली असता बाबू दगडू जाधव (वय 50) याच्या ताब्यातील एका प्लास्टिकच्या बरणीत ठेवलेले आठ गावठी बॉम्ब तसेच दुसर्या प्लास्टिकच्या पिशवीत सुमारे स्फोटके तयारकरण्यासाठी वापरण्यात येत असलेली पावडर आढळली. त्यामुळे पोलिसांनी अलिबाग येथून बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच ब्रुनो नावाच्या श्वानस पाचारण करून तपासणी व खात्री करण्यात आली. या प्रकरणी आरोपी बाबू जाधव आणि त्याला मदत करणारा त्याचा साडू राम यशवंत वाघमारे (वय 49, रा. विळा ता. माणगाव) यांना अटक केली. त्यांना चासलाल (पूर्ण नाव माहीत नाही, रा. मध्य प्रदेश) हा गावठी बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारी सामुग्री पुरवित असतो तसेच स्वतःही बॉम्ब तयार करून विकत असतो. या तिन्ही आरोपींविरुद्ध माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिसरा आरोपी चासलालचा शोध सुरू आहे. डुक्कर किंवा तत्सम जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी हे बॉम्ब तयार करण्यात आले होते, अशी प्राथमिक माहिती हाती लागली आहे. आदिवासी स्वतःच असे बॉम्ब तयार करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper