माणगाव ः प्रतिनिधी
माणगाव तालुक्यातील मांजुरणे गावातील एका 38 वर्षीय व्यक्तीचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 27) सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती संदीप जनार्दन रणपिसे रा. मांजुरणे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. दिलीप जनार्दन रणपिसे (वय 38) हा मंगळवारी (दि. 26) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास गावातून फेरफटका मारून येतो असे नातेवाईकांना सांगून गेला होता, मात्र बराच वेळ तो न परतल्याने फिर्यादी संदीप रणपिसे व नातेवाईकांनी त्याचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. त्यानंतर बुधवारी (दि. 27) दिलीपचा मृतदेह तलावात आढळला. त्यास उपचाराकरिता माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूप्रमाणे करण्यात आली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper