कर्जत : बातमीदार
अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (नागपूर), पशुवैद्यकीय महाविद्यालय (परळ, मुंबई), तसेच माथेरान नगर परिषद व स्थानिक अश्वपाल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने माथेरानमधील टेनिस कोर्ट येथे घोड्यांची आरोग्य तपासणी आणि नसबंदी शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात 16 घोड्यांची नसबंदी शस्त्रक्रिया, तर 50 घोड्यांची रक्ततपासणी करण्यात आली. काही घोड्यांची आरोग्य तपासणीदेखील करण्यात आली. माथेरानमधील अश्वांना आरोग्यदायी लाभ मिळावा, यासाठी आमच्या महाविद्यालयाचे तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक दर महिन्याला येथील अश्वपालकांना सेवा देतील, असे आश्वासन पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्रमुख पशू शल्यचिकित्सक डॉ. जी. एस. खांडेकर यांनी या वेळी दिले.
नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भराडकर, डॉ. संतोष पाटील, डॉ. सलील हांडे, डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. शलाका चव्हाण, डॉ. अरविंद चव्हाण, डॉ. धर्मराज रायबोले, अश्वकल्याण समितीचे सचिन पाटील, शैलेश शिंदे, लॉजिंग संघटनेचे अध्यक्ष सागर पाटील, स्मिता गायकवाड, रमेश शिंदे यांच्यासह अश्वपालक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper