
कर्जत : बातमीदार
शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ माथेरानमध्ये रॅली काढण्यात आली होती. सरिता श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत काढलेली ही प्रचार रॅली श्रीरंग बारणे यांना माथेरान, तसेच तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून देईल व त्यांना विजयी करील, असा विश्वास प्रसाद सावंत यांनी व्यक्त केला.
रॅलीमध्ये नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, शिवसेना महिला जिल्हा संघटक रेखा ठाकरे, जिल्हा उपप्रमुख महेंद्र थोरवे, तालुका प्रमुख संभाजी जगताप, तालुका संघटक राजेश जाधव, शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी, भाजप शहर अध्यक्ष विलास पाटील, माजी नगराध्यक्ष बबिता शेळके, आरपीआय शहर अध्यक्ष अनिल गायकवाड, नगरसेविका सोनम दाभेकर, प्रतिभा घावरे, ज्योती सोनावणे, माजी नगरसेवक कुलदीप जाधव, प्रदीप घावरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महायुतीच्या रॅलीला मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या रॅलीची सुरुवात हॉटेल सन अॅण्ड शेडपासून झाली. रॅलीमध्ये महिलांनीदेखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. या वेळी बारणे यांच्या पत्नी सरिता बारणे यादेखील उपस्थित होत्या, या वेळी सरिता बारणे यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून येथील श्रीराम मंदिर येथे प्रचाराचा नारळ वाढवला. रॅलीतील कार्यकर्त्यानी ‘कोण आला रे कोण आला, महायुतीचा वाघ आला‘ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला, तसेच घरोघरी पत्रक वाटून बारणे यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन कार्यकर्ते मतदारांना करीत होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper