किराणा साहित्य मिळणार घरपोच; तरुणाची संकल्पना
अलिबाग : प्रतिनिधी
सध्या कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. रोजच्या वापरातील किराणा साहित्य घेण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही, शिवाय वेळेचा अपव्यय होतो. अशा वेळी अलिबागमधील एका तरुणाने माय रायगड नावाचे मोबाइल अॅप्लिकेशन तयार केले आहे. या माध्यमातून किराणा साहित्यातील जवळपास 500हून अधिक वस्तू घरपोच मागवणे शक्य झाले आहे.
अलिबागेत राहणार्या हर्षल कदम या तरुणाने आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन माय रायगड हे नवीन अॅप्लिकेशन तयार केले आहे. ते मोबाइलमध्ये उघडल्यावर इन्स्टॉलचा पर्याय येतो. यात आपल्याला हव्या त्या साहित्याची ऑर्डर दिल्यानंतर दोन ते तीन तासांत साहित्य घरपोच मिळणार आहे. त्यासाठी किराणा साहित्य, भाजीपाला होलसेल विकणार्या व्यावसायिकांशी टायअप केले गेले आहे. एखादी वस्तू उपलब्ध नसेल तर तशी नोंद अॅपवर येते. किराणा मालाबरोबरच काही शेतकर्यांशी संलग्न राहून भाजीपालादेखील पुरवण्यास कदम व सहकार्यांनी सुरुवात केली आहे.
चाचणी प्रक्रियेत आतापर्यंत 70हून अधिक ग्राहकांना घरपोच सेवा देण्यात आली आहे. मालाची घरपोच डिलेव्हरी झाल्यानंतर रोख पैसे देण्याबरोबर ऑनलाइन पैसे चुकते करणेही यामध्ये शक्य आहे. सध्या अलिबाग तालुक्यापुरती मर्यादित असलेली ही सेवा भविष्यात रायगड जिल्ह्यात देण्याचा त्याचा मानस असून, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असल्याचे हर्षल कदम यांनी सांगितले.
अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या उपस्थितीत या अॅपचे अनावरण करण्यात आले. या वेळी शेजाळ यांनी कोरोनाच्या काळात हा अतिशय चांगला पर्याय असून, घरबसल्या आवश्यक साहित्याची मागणी करून आपल्याला आरोग्य जपणे शक्य असल्याचे म्हटले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper