आमदार प्रशांत ठाकूर यांचे मानले आभार
पनवेल : रामप्रहर वृत्त
तळोजा एमआयडीसीतील मालदार बॅरल्स कंपनीमधील कामगारांच्या न्यायासाठी सुरू असलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी ठरला. कंपनीकडून मिळणार्या कायदेशीर देण्यांची अंमलबजावणी झाल्याने कामगारांमध्ये समाधानाची भावना असून या विजयात आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या ठाम सहकार्याचा मोठा वाटा असल्याचे कामगारांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र कामगार संघटनेच्या माध्यमातून हा लढा सातत्याने लढवण्यात आला. अनेक बैठकांपासून चर्चांपर्यंत संघटनेचे अध्यक्ष सागर राजे व सहकार्यांनी घेतलेली मेहनत अंतिम टप्प्यात निर्णायक ठरली. या संपूर्ण प्रक्रियेनंतर कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी कामगार प्रतिनिधी मंडळाने आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली व त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
या भेटीदरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाराष्ट्र कामगार संघटनेच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक केले. सागर राजे आणि त्यांच्या टीमने घेतलेल्या कष्टांमुळे हा न्याय मिळाल्याचे ते म्हणाले. कामगारांचे अभिनंदन करत त्यांनी पुढील वाटचालीत न्याय्य हक्कांसाठी जागरूक राहण्याचा आणि संघटितपणे उभे राहण्याचा मोलाचा सल्ला दिला.
या वेळी कामगारांच्या चेहर्यावर एक प्रकारचा दिलासा आणि दीर्घ लढ्यानंतर मिळालेल्या न्यायामुळे समाधानाची झळाळी दिसत होती. तळोजा एमआयडीसीतील या घडामोडीमुळे कामगार चळवळीला नवे बळ मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper