Breaking News

मास्क हीच तूर्तास लस?

कोरोनाच्या आघाडीवर भारतासाठी काहिशी ‘गुड न्यूज’ आहे. भारतात प्रचंड संख्येने म्हणजे 50 लाखांच्या वर कोरोना रुग्ण आहेत, असे ऐकल्यावर आपली छाती दडपते, परंतु त्याच भारतात जगातील सर्वाधिक जवळपास 45 लाख बरे झालेले कोरोना रुग्ण आहेत हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. आपला कोविड-19मधून बरे होण्याचा दर आता 80 टक्क्यांच्या पुढे गेला आहे.

जगभरातील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 17.7 टक्के रुग्ण हे भारतातले आहेत, तर जगातील कोविड-19मधून बर्‍या झालेल्या रुग्णांपैकी 19.5 टक्के रुग्ण भारतातील आहेत. जगातील बरे झालेले सर्वाधिक 44 लाख 99 हजार 867 कोरोना रुग्ण भारतात आहेत. गेले सलग चार दिवस आपल्या देशात नोंदल्या गेलेल्या कोरोनाच्या नव्या केसेसपेक्षा बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या अधिक राहिली आहे. ही सारी तुलनात्मक आकडेवारी देशाकरिता निश्चितच दिलासादायक आहे. गेल्या 24 तासांत देश पातळीवर एक लाखांहून अधिक कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. आजच्या घडीला आपला कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 1.60 टक्के इतका असून प्रति 10 लाख लोकसंख्येमागील कोविड-19 मृत्यूचे प्रमाणही भारतात अतिशय कमी आहे. भारतात प्रति 10 लाख लोकसंख्येमागे 64 मृत्यू असे प्रमाण दिसते, तर जागतिक स्तरावर तेच प्रमाण सरासरी 123 मृत्यू असे आहे. या दिलासादायक आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या सात राज्यांचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून कोरोनासंबंधी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. येत्या महिन्यापासून देशभरात सणासुदीचा मोसम सुरू होणार असल्यामुळे या काळात अधिक दक्षता घेण्याची गरज आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे अद्यापही सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहेच. कोरोना आघाडीवरील दखल घेण्याची आणखी एक़ ठळक बाब म्हणजे मास्कमार्फतच काही जणांची रोगप्रतिकारशक्ती वाढून त्यांना काही प्रमाणात कोरोनापासून संरक्षण मिळू शकते, असा एक नवा विचार काही तज्ज्ञ डॉक्टरांनी मांडला आहे. लसींचा शोध लागण्यापूर्वी कांजण्यांपासून संरक्षण मिळवण्याकरिता ‘व्हॅरिओलेशन’ची प्रक्रिया वापरली जात होती. विषाणूंपासून संरक्षण मिळवण्याकरिता मुद्दाम त्या विषाणूशी काहिसा संपर्क येऊ द्यायचा, जेणेकरून शरीरात त्याविरोधात संरक्षक प्रतिबंधात्मक प्रतिक्रिया जन्मास यावी अशी ही पद्धत होती. मास्कच्या वापरामुळे आता काही जणांच्या बाबतीत काहिसे तसेच घडत असावे असे या तज्ज्ञांना वाटते. कोरोना विषाणूबाधित प्राण्यांच्या निरीक्षणांतून तसेच सर्वसाधारण माहितीवरून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. मास्कमुळे आपल्या श्वसन नलिकेमध्ये अगदी कमी प्रमाणात कोरोना विषाणू जातात. त्यामुळे आपण आजारी पडण्याची शक्यता कमी होते व जे काही थोडे थोडके विषाणू शरीरात जातात त्यांना ध्यानात ठेवून आपल्या पेशी त्यांच्याशी लढण्याकरिता सज्ज होतात. ही प्रक्रिया लसीसारखीच असल्याने सुरक्षित लस येईपर्यंत मास्क हेच आपल्याकरिता लसीचे काम करतील, असे या तज्ज्ञांनी म्हटले आहे. अर्थात मास्क हा काही लसीला पर्याय होऊ शकत नाही याचा खुलासाही त्यांनी केला आहे. आपल्या आरोग्य मंत्रालयानेही या विचाराला पुष्टी देऊन लोकांना न चुकता मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. अर्थात त्यासोबत सोशल डिस्टन्सिंग व हात धुण्यासारख्या अन्य दक्षताही पाळतच राहायचे आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply