Breaking News

मिट्टी में मिला दिया

उत्तर प्रदेशातील माफिया इतकी वर्षे कोणी जोपासला? असंख्य गुन्हे नावावर असतानाही गुंडांना पक्षाची उमेदवारी देण्याचे धाडस कोण दाखवत होते? काही स्वार्थांध राजकारण्यांच्या कृपाछत्रामुळेच उत्तर प्रदेशात संघटित गुन्हेगारी फोफावली. माफिया डॉन कितीही मोठा असला तरी त्याची पर्वा न करता त्यांना मातीत घातले जाईल… हम उन्हें मिट्टी में मिला देंगे असे उद्गार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काढले होते. त्यानंतर उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी जगतात प्रचंड घबराट पसरली. आदित्यनाथ यांनी दिलेली धमकी पोकळ नव्हती हे असदच्या एन्काऊंटरनंतर सिद्ध झाले. सुमारे महिन्याभरापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भर विधानसभेत गर्जना केली होती की उत्तर प्रदेशातील कुठल्याही माफिया गुंडाला सोडणार नाही. त्यांना मातीत मिसळवले जाईल. त्यांची ही गर्जना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अथवा राजकीय लाभासाठी केलेली नव्हती. या घोषणेमागील संताप समजून घेण्याची गरज आहे. उत्तर प्रदेशातील कुख्यात माफिया डॉन अतीक अहमद सध्या गजाआड आहे. प्रयागराज येथील उमेश पाल नामक वकीलाला दिवसाढवळ्या गोळ्या घालण्याचा ‘पराक्रम’ या माफिया डॉनने करून दाखवला होता. ही घटना घडल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील समाजकारण गुन्हेगारांच्या तावडीतून सोडवण्याचा चंगच बांधला. उत्तर प्रदेशची सूत्रे आदित्यनाथ यांनी हाती घेतल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्याला प्राधान्य दिले होते. त्यानंतर अनेक गुंडांना गजाआड करण्यात आले तर काहींना थेट यमसदनी धाडण्यात आले. संघटित गुन्हेगारीला आळा बसत गेला. अतीक अहमद याचे साम्राज्य मात्र तुरुंगातूनदेखील चालवले जात होते. त्याची मुले त्याचे गुन्हेगारी साम्राज्य सांभाळत असत. त्यांची आई म्हणजेच अतीक अहमदची पत्नी शाईस्ता ही देखील सक्रियपणे गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील होती. खून, खंडणी, अपहरणे, चोरटा व्यापार अशा असंख्य गुन्ह्यांची नोंद या अतीक अहमद आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर आहे. उमेश पाल या वकिलाच्या खुनासंदर्भात अतीक अहमदचा मुलगा असद हा पोलिसांना हवा होता. पाल याच्या हत्येनंतर तो फरार झाला. आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या पोलिसांच्या विशेष कृती दलाने त्याला झाशीच्या परिसरात हुडकून काढले आणि संपवून टाकले. असदच्या एन्काऊंटरमुळे आदित्यनाथ यांनी भर विधानसभेत केलेल्या गर्जनेची आठवण अनेकांना झाली. संघटित गुन्हेगारीविरुद्ध आदित्यनाथ यांनी चालवलेल्या मोहिमेवरून अनेकदा त्यांच्यावर टीकादेखील झाली. गुन्हेगारीविरुद्ध बेधडक कारवाया करणार्‍या आदित्यनाथ यांना ‘बुलडोझर बाबा’ अशी उपाधी मिळाली आहे. तथापि, मुख्यमंत्री आदित्यनाथ हे न्यायालयाचे महत्त्व मानत नसल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे प्रमुख नेते अखिलेश यादव आणि एमआयएमचे प्रमुख नेते असदउद्दीन ओवैसी या दोघांनीही केला आहे. ज्या अतीक अहमद याच्या गुन्हेगारी साम्राज्याविरोधात मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी आघाडी उघडली आहे, त्याच अतीक अहमद याने 1995 साली बहुजन समाज पक्षाच्या नेत्या श्रीमती मायावती यांच्यावर लखनौच्या विश्रामगृहात प्राणघातक हल्ला चढवला होता हे लक्षात घ्यायला हवे. एकंदरीत कोणाचाही मुलाहिजा न ठेवणार्‍या योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या समाजकारणाची साफसफाई करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे हे खरे. विरोधक कितीही आरडाओरडा करत असले तरी उत्तर प्रदेशची जनता मात्र योगी आदित्यनाथ यांच्या मागे ठामपणे उभी आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply