काँग्रेसच्या अडचणींत वाढ
मुंबई ः प्रतिनिधी : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहिता उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवरा यांच्याविरोधात एल. टी. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेने देवरा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
लोकसभा निवडणूक काळात धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी आचारसंहिता भंग केल्याबाबत हा गुन्हा दाखल झाला आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने मिलिंद देवरा यांना 19 तारखेला नोटीस पाठविली होती. शिवसेनेच्या वतीने अॅड. धर्मेंद्र मिश्रा आणि सनी जैन यांनी 8 एप्रिल रोजी देवरांविरोधात आयोगाकडे तक्रार केली होती. त्यासोबत देवरा यांच्या भाषणाची सीडीही पाठवली होती. जैन मंदिराबाहेर शिवसेनेने मांस शिजविल्याचे विधान त्यांनी भुलेश्वर येथील भाषणात केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने त्यांच्या विरोधात खोटे वक्तव्य केल्याप्रकरणी भादंवि 171 आणि दोन समुदायांमध्ये निवडणूक काळात तेढ निर्माण केल्याबद्दल भादंवि 125 या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
मिलिंद देवरा हे दिवगंत काँग्रेस नेते मुरली देवरा यांचे सुपुत्र आहेत. दक्षिण मुंबई हा त्यांचा मतदारसंघ आहे. मतदारसंघ फेररचनेनंतर 2009 साली ते दक्षिण मुंबईतून निवडून लोकसभेवर गेले. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या मोहन रावले यांचा पराभव केला होता. मनसेमुळे मराठी मतांमध्ये झालेल्या मतविभाजनाचा त्यांना फायदा झाला होता. त्यानंतर 2014 साली मोदी लाटेत शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला. मिलिंद देवरा यांनी संपुआ दोनच्या कार्यकाळात केंद्रात मंत्रीपद भूषवले आहे. आता मुंबई काँग्रेसमध्ये त्यांना महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper