पनवेल, मुंबई : प्रतिनिधी
नागरिक व त्यांच्या वाहनांची मोठी गर्दी सोमवारी (दि. 23) सकाळी अचानकपणे बाहेर पडल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या प्रवेशद्वाराजवळ कळंबोली येथे झाली होती. ही गर्दी टाळण्याच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी एक्स्प्रेस वेवरील वाहतूक काही काळासाठी बंद केली होती. गर्दी ओसरल्याने पुन्हा एकदा द्रुतगती महामार्ग खुला करण्यात आला.
अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन सरकारने केले आहे. तरीदेखील मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडत आहेत. विशेषतः मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे वाहतूक पोलिसांचा लक्षात आल्याने पुण्याकडे जाणार्या वाहनांना कळंबोली येथेच रोखण्यात आले. या वेळी अनेक वाहनांना पोलिसांनी माघारी पाठविले. अचानक वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक पोलिसांवर मोठा ताण आला होता. अखेर वाहनांची संख्या कमी झाल्यावर द्रुतगती महामार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला, अशी माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वाहतूक उपायुक्त सुनील लोखंडे यांनी दिली.
मुंबई आणि पुण्यात सर्वात जास्त कोरोनाची लागण झालेले रुग्ण सापडले असून या दोन शहरांमध्ये सर्वात जास्त चिंतेचे वातावरण आहे. राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद केल्या आहेत. 31 मार्चपर्यंत सुटी मिळाली असल्याने मुंबईतील अनेक नागरिक पुणे, सातारा. कोल्हापूर, कोकण, तसेच इतर ठिकाणी आपल्या गावी जात आहेत. लोकांना घरात थांबण्याचे आवाहन केले जात असतानाही लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असून रस्त्यांवर गर्दी करीत आहेत. त्यामुळेच एक्स्प्रेस वे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु काही वेळाने वाहतूक पूर्ववत झाल्यानंतर हा मार्ग खुला करण्यात आला.
कारण नसताना घराबाहेर पडून वाहतूक कोंडी करणार्या वाहन चालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवा पुरविणार्या वाहनचालकांनीच घराबाहरे पडावे, असे आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी केले आहे.
Check Also
केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा
पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …
RamPrahar – The Panvel Daily Paper