औरंगाबाद : प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या 15 दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला तीन महिने उलटूनही निर्णय घेतला नाही. त्यामुळे हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा ताफा अडवणार आहोत, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी पत्रकार परिषदेत दिला. मराठा विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय स्वतंत्र वसतिगृह बांधावे, ‘सारथी’ संस्थेचे उपकेंद्र द्यावे आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची 10 लाख रुपये कर्ज प्रस्तावाची मर्यादा 25 लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाने केली होती. या पार्श्वभूमीवर संघटनेचे समन्वयक आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली होती. हे प्रश्न 15 दिवसांत सोडवण्याचे आश्वासन देऊनही मागण्या प्रलंबित असल्याबाबत संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. येत्या 17 सप्टेंबरला मुख्यमंत्री ठाकरे हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला औरंगाबादमध्ये येणार आहेत. या वेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवणार आहोत, असे केरे यांनी सांगितले तसेच येत्या 7 ऑक्टोबर रोजी राजकीय पक्षप्रमुखांच्या निवासस्थानासमोर शासनाच्या ‘जीआर’ची होळी करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढण्याचे नियोजन सुरू आहे, अशी माहिती केरे यांनी दिली. पत्रकार परिषदेला समन्वयक अप्पासाहेब कुढेकर, राहुल पाटील, किरण काळे, भरत कदम, निवृत्ती मांडकीकर, मनोज मुरदारे आदी उपस्थित होते.
Check Also
ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …
RamPrahar – The Panvel Daily Paper