पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका महिला व बालकल्याण विभाग आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या माध्यमातून मुद्रा लोन मेळावा आणि मार्गदर्शन शिबिर गुरुवारी (दि. 29) आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यात मुद्रा लोनसाठी लागणार्या आवश्यक बाबी, तसेच बँकेतून कर्ज घेण्यासाठी लागणार्या कागदपत्रांबद्दल माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा बँक योजना 8 एप्रिल 2015 रोजी कार्यान्वित केली. या योजनेनुसार कोणत्याही प्रकारचे तारण किंवा जामीनदाराशिवाय होतकरू बेरोजगारांना कर्जपुरवठा करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेचा लाभ पनवेल महापालिका क्षेत्रातील युवक-युवती तसेच बचतगटातील महिलांना व्हावा यासाठी पनवेल महापालिकेमार्फत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मुद्रा लोन मेळावा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त जमिर लेंगरेकर, संजय शिंदे, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती लीना गरड, प्रभाग समिती अध्यक्ष संजय भोपी, शत्रुघ्न काकडे, गोपीनाथ भगत, तेजस कांडपिळे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, महापालिकेचे अधिकारी, विविध बँकांचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
बेरोजगार तरुणांनी मुद्रा योजनेची माहिती व लाभ घ्यावा. तारण, जामीनदार याची गरज नाही. बेरोजगारांबरोबर युवती, महिला, बचतगट यांनीही योजनेचा लाभ घेऊन स्वावलंबी बनावे.
-आमदार प्रशांत ठाकूर
RamPrahar – The Panvel Daily Paper