
मुरुड : प्रतिनिधी
शहरापासून 15 किमी अंतरावर असलेल्या चिचघर धरणाकडे लघुपाटबंधारे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष्य झाले आहे. त्यामुळे हे धरण ओसाड व असुरक्षीत झाले आहे. प्रामुख्याने शेतीला पाणी पुरविण्यासाठी 1988साली चिचघर धरणाची उभारणी करण्यात आली होती. या धरणाची गेल्या अनेक वर्षापासून डागडूजी करण्यात आलेली नाही. धरणाच्या भिंतीवर मोठमोठी झाडे रुजलीत आहेत. भिंतीवरील पायवाट सोडली तर सर्वत्र जंगल तयार झाले आहे. मागील काही वर्षे गावातील नारायण अरकर नावाचा शिपाई येथे कार्यरत होता. तो असताना थोडीफार देखभाल होत होती, मात्र त्यांच्या पश्चात लघुपाटबंधारे विभागाचा कोणताही कामगार या धरणाकडे फिरकलाही नाही. धरणाखाली असलेल्या औटहाऊसचीदेखील दुर्दशा झाली आहे. पुर्वी पावसाळ्यात हे धरण भरून वाहू लागले की, धरणातून कोसळणार्या पाण्यात पर्यटक आनंद घेत असत. दोन डोंगरांच्यामध्ये असलेल्या या धरणाच्या परिसरात हिरवी चंदर पसरायची. धरणाच्या भिंतीवर पायवाट असल्याने पर्यटक धरणखालील आगरदांडापर्यंत शेती पाहण्यासाठी व फोटो काढण्यासाठी जात असत. असा निसर्गरम्य परिसर देखभाली अभावी सध्या ओसाड झाला आहे. या धरणातील पाणी थेट गावांना जात नाही. धरणाच्या खालच्या बाजूला विहिरी बांधण्या आल्या आहेत, या विहिरीतून जावळी, आगरदांडा, उसंडी, टोकेखार, सावली, मिठेखार अशा गावांना पाणी पुरवठा होतो. मात्र धरणांची देखभाल व सुरक्षा होत नसल्याने धरणाच्या पाण्यात नेहमी गुरे बसलेली असतात. परिसरात विषारी जनावरांचा वावर असल्याने धरणातील पाण्याचा वापर पिण्यासाठी करणे कितपत योग्य आहे ही शंका आहे. दिघी पोर्ट प्रकल्प आल्याने या परिसराचा विकास वेगाने होऊ लागला आहे. त्यामुळे आगरदांड्या शेजारी असलेल्या या चिचघर धरणाची दुरुस्ती व परिसराचे सुशोभीकरण तज्ज्ञ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याची मागणी परिसरातील जनता करीत आहे.
लघुपाटबंधारे विभागाने चिचघर धरणाचे पाणी शेतीसाठी उपलब्ध करून दिले तर शेतकरी संपन्न होईल. मात्र त्या आधी धरणाची पूर्ण तपासणी करण्यात यावी. धरणाच्या भिंतीवर वाढलेल्या झाडीझुडपांमुळे धरण सुरक्षीत आहे का, हे तपासण्यात यावे.
-संतोष पाटील, माजी सरपंच, नांदले, ता. मुरूड
RamPrahar – The Panvel Daily Paper