Breaking News

मुरूडमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रुग्णवाहिकेच लोकार्पण

मुरूड : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार गोरगरीब लोकांसाठी अनेक योजना राबवित आहे. भाजपमधील प्रत्येक कार्यकर्ता,  पदाधिकार्‍याने या सरकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवल्या पाहिजेत. मग यातून आपला पक्षही मजबूत होईल, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 5) मुरूड येथे केले.
भाजपचे मुरूड तालुका उपाध्यक्ष परेश किल्लेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात भाजपच्या विचारधारेकडे आकर्षित होऊन असंख्य तरुणांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या तरुणांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, उपाध्यक्ष परेश किल्लेकर, रोह्याचे माजी नगराध्यक्ष संजय कोनकर, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, मुरूड शहर अध्यक्ष उमेश माळी, जयवंत अंबाजी, शैलेश काते, बबलू पांगारकर, नरेश वारगे, युवा मोर्चा अध्यक्ष समीर शिंदे, महेश मानकर, बाळा भगत आदी होते.
आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे 282 खासदार निवडून आले होते. पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांचे लोकाभिमुख काम देशातील समस्त जनतेला आवडल्याने आणि त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या पाच वर्षांतील उत्कृष्ट कामगिरीमुळे 2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे 303 खासदार लोकांनी निवडून दिले आहेत. जनतेचा विश्वास पुन्हा एकदा सार्थ ठरवित केंद्र सरकारच्या माध्यमातून गॅस सिलिंडर मोफत मिळणारी उज्ज्वला योजना, गरिबांना घरे मोफत देणारी पंतप्रधान आवस योजना आदी असंख्य योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लोकांना मिळवून देण्यासाठी भाजप कार्यकर्ता, पदाधिकार्‍यांनी सर्वसामान्यांच्या घरापर्यंत गेले पाहिजे. सजगपणे काम करून पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबरच सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमात मुरूड तालुक्याच्या विविध भागांतील विशाल कांबळे, गणेश दिवेकर, मितेश दिवेकर, पंकज भोईर, अशिता भोईर, आकांक्षा चौलकर यांच्यासह असंख्य तरुणांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांनी स्वागत केले.

शेकापसह मविआ सरकारवर टीका
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भ्रष्ट आणि घोटाळेबाज शेकापसह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. 15 जून 2021पासून शेकापचे माजी आमदार विवेक पाटील हे कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी जेलमध्ये आहेत. बँक घोटाळ्यात आपली चौकशी होऊ नये म्हणून शेकापने महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन तूर्तास आपली चौकशी टाळली आहे, असा आरोप या वेळी आमदार प्रशांत ठाकूर केला.

परेश किल्लेकर हे सामाजिक उपक्रमातून पक्ष संघटना बळकट करण्याचे काम करीत आहेत. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. लवकरच मुरूडमध्ये भाजपचे मध्यवर्ती कार्यालय सुरू करणार असून लोकांच्या समस्या या कार्यालयामार्फत सोडवण्याचा आमचा मानस आहे.
-अ‍ॅड. महेश मोहिते, अध्यक्ष,दक्षिण रायगड जिल्हा भाजप

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply