मुरूड : प्रतिनिधी
तालुक्यात हमीभाव भात खरेदी केंद्र सुरू होत नसल्याने मुरूड तालुक्यातील शेतकरी नाराज झाले असून, येत्या आठ दिवसात भात खरेदी केंद्र सुरु झाले नाही तर सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून जन आंदोलन करतील असा इशारा किसान क्रांती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीधर जंजीरकर यांनी दिला आहे. जिल्ह्यातील 13 तालुक्यांत एकूण 35 हमीभाव भात खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. मात्र मुरूड तालुक्याला वगळण्यात आले असल्याचे किसान क्रांती संघटनेच्या शिष्टमंडळाने मुरुड तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिले होते. जिल्हा मार्केटिंग अधिकारी जे. बी ताटे यांनी मुरुड तालुक्यात आठ दिवसात हमीभाव केंद्र सुरु करणार असल्याचे सांगितले होते. त्याला 15 दिवसापेक्षा अधिक कालावधी होऊनसुद्धा हमीभाव भात खरेदी केंद्र सुरु होत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.
मुरुड तालुक्या हमीभाव भात केंद्र सुरु करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी, स्थानीक आमदार व जिल्हा मार्केटिंग अधिकार्यांनी दिले होते. त्याला 15 दिवसापेक्षा अधिक कालावधी जाऊनही भात केंद्र सुरु झालेले नाही. येत्या आठ दिवसात मुरूडमध्ये भात खरेदी केंद्र सुरु न झाल्यास शेतकरी मोठे जनआंदोलन करतील.
-श्रीधर जंजीरकर, राज्य उपाध्यक्ष, किसान क्रांती संघटना
RamPrahar – The Panvel Daily Paper