अॅड. परेश देशमुख यांची माहिती

मुरूड : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अलिबाग-मुरूड मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष सज्ज असून, या मतदारसंघातून पक्षाचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी असंख्य कार्यकर्त्यांची मागणी असून, त्यांना तिकीट मिळावे यासाठी आम्ही आग्रही व प्रयत्नशील असल्याचे विधानसभा क्षेत्र सरचिटणीस अॅड. परेश देशमुख यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले.
या वेळी एका प्रश्नाला उत्तर देताना अॅड. देशमुख यांनी सांगितले की, शिवसेना-भाजप युती होणारच आहे, परंतु आम्ही अलिबाग-मुरूड विधानसभा क्षेत्राची निवडणूक लढवण्यास उत्सुक असून, यासाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून आहोत. मागील काही वर्षांपासून या मतदारसंघातून शेकाप विरुद्ध शिवसेना लढत होत आहे, परंतु अपेक्षित यश मिळत नसल्याने ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्यास आम्ही या संधीचे सोने करू शकतो. तसा आत्मविश्वास असंख्य कार्यकर्त्यांना असून, या वेळच्या निवडणुकीत ही जागा आम्हाला मिळावी यासाठी आग्रही आहोत. केंद्रात व राज्यात भाजप व शिवसेनेचे राज्य असून अलिबाग-मुरूडच्या विकासासाठी केंद्र व राज्याच्या अनेक योजनांतून आम्ही कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवून दिला. यातील काही भागात विकासकामे सुरू असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper