मुरूड : प्रतिनिधी
येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे रूग्णालयाचा परिसर कमी पडू लागला आहे. तसेच कोरोनाविषयक नियमाचा भंग होताना दिसत आहे. परिणामी संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामीण रुग्णालयात होत असलेली गर्दी टाळण्यासाठी शहरातील कुलसुम बेगम हॉस्पिटल किंवा पटांगण तसेच तालुक्यातील आगरदांडा व नादगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे. मुरूड ग्रामीण रूग्णालयात मंगळवारी पुन्हा लस घेण्याकरिता गर्दी होती, आतापर्यत येथे 1710 जणांचे लसीकरण करण्यात आले. शहरातील कुलसुम बेगम हॉस्पिटल तसेच तालुक्यातील आगरदांडा व नादगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू केल्यास त्या त्या परिसरातील लोकांना त्याचा लाभ घेता येईल तसेच मुरूड ग्रामीण रूग्णालयात गर्दी कमी होईल. यासाठी आरोग्य विभागाने लसीकरणसाठी जागा शोधावी, अशी मागणी होत आहे. मुरुड ग्रामीण रुग्णालयात सध्या डॉक्टरांची कमतरता भासत आहे. ओपीडीतील नियमीत काम सांभाळून येथील डॉक्टरांना लसीकरणही करावे लागत आहे. डॉक्टरांची संख्या वाढली तर लसीकरणला वेग येवू शकतो.
RamPrahar – The Panvel Daily Paper