मुरूड : प्रतिनिधी
शेजारील श्रीवर्धन तालुक्यात कोरोनाचा रूग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुरूड शहर रविवार व बुधवार असे दोन दिवस पूर्णत: बंद असणार आहे. व्यापारी, पोलीस आणि नगर परिषद यांनी मिळून हा निर्णय घेतला असून यातून अत्यावश्यक सेवा असलेली औषधांची दुकाने वगळण्यात आली आहेत.
कोरोना विषाणूने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. मुरूड त्याला अपवाद आहे. मुरूड तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाहीए, पण नुकतेच शेजारील श्रीवर्धन तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने मुरूडकरांनी दक्षतेच्या दृष्टीने आणखी एक पाऊल उचलले आहे. पोलिसांनी बाजारपेठेतील व्यापार्यांना नगर परिषद कार्यालयात बोलावून अजूनही ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर राखले जात नाही आणि त्यावर उपाय म्हणून किराणा दुकाने आठवड्यातील पाच दिवस सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत उघडी व त्यानंतर पूर्णपणे बंद राहतील तसेच रविवार व बुधवार मेडिकल सोडून सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहतील, असे सूचित केले.या बंदला रविवार (दि. 19)च्या पहिल्याच दिवशी प्रतिसाद लाभला. मुरूड बाजारपेठ सकाळपासून बंद होती. पोलीस निरीक्षक पवार यांनी शहरात येणार्या सर्व चेक नाक्यांवर कडक बंदोबस्त ठेवला होता.
RamPrahar – The Panvel Daily Paper