नवी मुंबई ः प्रतिनिधी
महाराष्ट्रातील बीड येथील 17 वर्षीय तरुणाच्या पालकांनी अतिशय धाडसी निर्णय घेत आपल्या मृत मुलाचे यकृत, मूत्रपिंड, फुप्फुसे, त्वचा आणि डोळे हे अवयव दान केले आहेत. त्यांच्या या उदात्त कृतीमुळे सात जणांनाअवयवदानाचा फायदा होऊन त्यांची आयुष्ये वाचली. 2019 सालातील हे मुंबईतील 28वे, तर नवी मुंबईतील पाचवे अवयवदान ठरले. रस्ते अपघातात या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये सीनिअर कन्सलटंट न्यूरोसर्जरी डॉ. अशोक हांडे आणि प्रमुख आयसीयू अॅण्ड क्रिटिकल केअर डॉ. चंद्रशेखर तुलसीगिरी यांच्या देखरेखीलखाली ठेवण्यात आले, मात्र त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. या वेळी हॉस्पिटलमधील मेडिकल सोशल वर्कर्सनी मृताच्या पालकांना अवयवदानाबद्दल माहिती सांगितली. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर मुंबईने मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील विविध हॉस्पिटल्समध्ये हे अवयव वितरित केले. डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ आणि मेडिकल सोशल वर्कर्स यांच्यातील सुयोग्य समन्वयामुळे हे अवयव प्रत्यारोपणासाठी पुन्हा वापरता आले. वाशीतील हिरानंदानी या दाता हॉस्पिटलला किडनी देण्यात आली. प्रतीक्षा यादीतील एका 46 वर्षीय महिला रुग्णाला ही किडनी देण्यात आली.
RamPrahar – The Panvel Daily Paper